पोलिस दलामध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने नऊ वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वरळी पोलिसांनी त्वरित कारवाई करीत हे घृणास्पद कृत्य करणाऱ्या उपअधीक्षकाला अटक केली.
मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार, ही घटना २३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सर पोचखानवाला रोडवरील सिंग गार्डनमध्ये घडली. ही मुलगी गार्डनमध्ये खेळायला गेलेली असताना उपअधीक्षक तिथे बसला होता. मुलीला एकटीला पाहून त्याने तिच्यासमोर अश्लील चाळे केले आणि जबरदस्तीने जवळ घेत वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्श करण्यास सांगितले. मुलीने त्याच्या तावडीतून सुटका करून घेत पळ काढला आणि सर्व घटना आईला सांगितली. कुटुंबीयांनी कळविताच वरळी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. तेव्हाा मुलीने उपअधीक्षकाकडे बोट दाखवून ओळख पटवली.
पोलिसांनी उपअधीक्षकाला ताब्यात घेतल्याचे पाहून त्या ठिकाणी असलेला एक अल्पवयीन मुलगा पोलिसांकडे आला. काही दिवसांपूर्वी या काकांनी आपल्यासोबतही गैरप्रकार केल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी याबाबत ‘पोक्सो’ तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करून उपअधीक्षकाला अटक केली. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.






