नवी दिल्ली : भाजपने अमृतसर आणि जालंधरमधील दुहेरी स्फोटांद्वारे निवडणुकीच्या तोंडावर पंजाबमधील शांतता बिघडवण्यासाठी ‘मिशन पंजाब’ला सुरुवात केली असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे ( आप ) खासदार संजय सिंह यांनी गुरुवारी केला. पश्चिम बंगालमध्येही भाजप च्या विजयानंतर हिंसाचार पाहायला मिळत असल्याचेही ते म्हणाले. मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही बुधवारी दोन्ही स्फोटांसाठी भाजपला जबाबदार धरले होते. निवडून जिंकण्यासाठी भाजप असे करत असल्याचा आरोप मान यांनी केला.यामुळे बॉम्बस्फोटाच्या घटनेवरून ‘आप’ आणि भाजप आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे.
वाहनाची तोडफोड
हैदराबाद : केंद्रीय गृह राज्यमंत्री बंडी संजयकुमार यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून भाजप कार्यकर्त्यांनी गुरुवारी ‘बीआरएस’ आमदार पी. कौशिक रेड्डी यांच्या वाहनाची तोडफोड केली. या घटनेनंतर करीमनगर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. कौशिक रेड्डी ज्या इमारतीत होते, तेथे भाजप कार्यकर्त्यांना प्रवेश करण्यापासून पोलिसांनी रोखले. इमारतीखाली मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
त्रास देणाऱ्याची धिंड
आरिकेरा : वारंवार लैंगिक छळाला बळी पडलेल्या महिलेने आरोपीला सर्वांसमक्ष चपलेने मारहाण केली, त्यानंतर संतप्त गावकऱ्यांनीही त्या व्यक्तीला बेदम मारहाण केली. आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील अरिकेरा गावात ही घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून आरोपी तिचा पाठलाग करीत होता आणि वारंवार लैंगिक संबंधांची मागणी करीत होता. यानंतर संतप्त गावकऱ्यांनी आरोपीचे अर्धे टक्कल करून चपलांचा हार घालून गावातून धिंड काढली.





