विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीतही भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने तृणमूलच्या अनेक इच्छुक नेत्यांना पक्षात प्रवेश देण्याचे टाळले होते. सन २०२१मधील निवडणुकांच्या काळात अनेक तृणमूल नेते भाजपमध्ये आल्याने पक्षाच्या मूळ कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी होती. तृणमूल सरकारच्या काळात ज्यांनी आमच्यावर हल्ले केले, त्यांनाच भाजपमध्ये कसा मुक्त प्रवेश मिळत आहे, असा भाजप कार्यकर्त्यांचा प्रश्न होता. तो योग्य असल्याचे नंतर सिद्ध झाले. मागील निवडणुकीत मावळत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपचा पराभव झाल्यानंतर यातील अनेक नेते पुन्हा स्वगृही परतले होते. आता त्यातील अनेक जण भाजपसमोर रांग लावून उभे असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपकडे सत्ता येताच तृणमूल काँग्रेसचे अनेक वादग्रस्त कार्यकर्ते आणि नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेण्यासाठी रांग लावली आहे, मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अशा कलंकितांच्या पक्षप्रवेशावर अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. ‘तृणमूल’च्या कोणत्याही व्यक्तीला तूर्त भाजपमध्ये सामील करून घेऊ नका, असे निर्देश दिल्लीहून जारी करण्यात आले आहेत.
या राज्यातील भाजपच्या महाविजयानंतर ‘तृणमूल’चे अनेक कार्यकर्ते आपण भाजपचे असल्याचे भासवून जागोजागी ‘गुंडगिरी’ करत असल्याच्या तक्रारी दिल्लीच्या भाजप नेतृत्वाकडे पोहोचल्या आहेत. आताच्या निवडणूक निकालांनंतर काही ठिकाणी ‘तृणमूल’चे स्थानिक गुंड भाजपचे झेंडे आणि भगवी वस्त्र परिधान करून स्वतःचा संबंध भाजपशी जोडत असल्याच्या आणि खंडणीवसुलीसारख्या अनेक बेकायदा कृत्यांची मालिका सुरू ठेवत असल्याच्या बातम्या समोर आल्या. या प्रकारांना तातडीने आळा घालण्याचे आदेश भाजप नेतृत्वाने बंगालचे नेते व कार्यकर्त्यांना दिले आहेत. भाजप समर्थकांच्या अनेक सोशल मीडिया हँडलवर भाजपच्या नावाचा आणि झेंड्याचा गैरवापर झाल्याच्या घटना समोर आल्या असून, पश्चिम बंगाल प्रशासन आणि पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर त्या प्रकरणांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगार किंवा समाजविघातक व्यक्तींना आता भाजपमध्ये नव्याने प्रवेश दिला जाणार नाही, असे भाजप नेतृत्वाने स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले.







