धरमतर जेट्टी ते गेट वे ऑफ इंडिया हे ३६ किलोमीटरचे समुद्री अंतर सारा वर्तक या सात वर्षांच्या मुलीने ९ तास ३२ मिनिटांत पार केले. ही कामगिरी करून सर्वांत कमी वयात ३६ किमी समुद्री अंतर पार करणारी जलतरणपटू हा बहुमान तिने पटकावला आहे.
अलिबाग तालुक्यातील फोफेरी गावातील रहिवासी असलेली सारा सध्या पनवेल येथे वास्तव्यास आहे. ९ डिसेंबर २०२५ रोजी साराने हा विक्रम केला. समुद्रातील मोठमोठ्या लाटा, बदलणारे हवामान आणि प्रदीर्घ अंतर यावर मात करत अखंड पोहत तिने हा प्रवास पूर्ण केला. तिच्या या अद्वितीय कामगिरीची नोंद थेट ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन’मध्ये करण्यात आली आहे.
या विक्रमाबद्दल ३० एप्रिल रोजी नेपाळमधील काठमांडू येथे झालेल्या समारंभात साराचा विशेष सन्मान करण्यात आला. ‘धरमतर जेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया हे ३६ किमी अंतर पोहून पूर्ण करणारी सर्वांत लहान भारतीय जलतरणपटू’ म्हणून तिची नोंद करण्यात आली. सारा सध्या प्रशिक्षक ऋग्वेद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.




