इराणविरोधात लढण्यास इस्रायलची सज्जता

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अमेरिकेच्या इराणसोबतच्या शांतता चर्चेच्या वृत्तांदरम्यान, इस्रायलने इराणविरुद्ध लष्करी कारवाईची तयारी दर्शवली आहे. इस्रायली लष्करप्रमुख एयाल झमीर यांनी इराणविरुद्ध तीव्र युद्ध सुरू करण्यास आणि त्यांची क्षमता कमी करण्यास सैन्य सज्ज असल्याचे सांगितले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सुरक्षा मंत्रिमंडळाची बैठक झाली. लेबनॉनमध्ये इस्रायली सैन्याने हिज्बुल्लावर हल्ले सुरू ठेवले आहेत. पश्चिम आशिया आणि आखाती प्रदेशात तणाव आहे.

israels military preparedness against iran ready for war

जेरुसलेम : अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चेत प्रगती होत असल्याच्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर, इस्रायलने इराणविरुद्ध पुन्हा एकदा लष्करी कारवाई सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे.

इस्रायली सैन्य इराणविरुद्ध तातडीने तीव्र युद्ध सुरू करण्यास आणि इराणची क्षमता आणखी कमकुवत करण्यास पूर्णपणे सज्ज आहे, अशी घोषणा इस्रायलचे लष्करप्रमुख एयाल झमीर यांनी केली. लष्कराच्या नॉर्दर्न कमांडमधील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर रविवारी त्यांनी हे वक्तव्य केले. आम्ही आवश्यकतेनुसार आमची युद्धसज्जता आणि लष्करी लवचिकता कायम ठेवू, असेही ते म्हणाले. अमेरिका-इराण शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सुरक्षा मंत्रिमंडळाची रविवारी सायंकाळी बैठक झाली. दरम्यान, लेबनॉनमध्ये इस्रायली सैन्याकडून हिज्बुल्लावर सर्व बाजूंनी हल्ले सुरूच असल्याचे झमीर यांनी सांगितले. एप्रिल महिन्यात इस्रायल आणि लेबनॉन दरम्यान युद्धबंदीची घोषणा झाली असली, तरी इस्रायलने दक्षिण लेबनॉनमधून आपले सैन्य मागे घेतलेले नाही.

दरम्यान, पश्चिम आशिया आणि आखाती प्रदेशात सध्या तणावाचे वातावरण आहे.