तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकमधील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. बंडखोर गटातील तीन आमदारांनी सोमवारी विधानसभा अध्यक्ष जे. सी. डी. प्रभाकर यांच्याकडे आपल्या आमदारकीचे राजीनामे सादर केले. सी. व्ही. षण्मुगम आणि एस. पी. वेलुमणी यांच्या नेतृत्वाखालील गटातील हे आमदार असून, उर्वरित पाच आमदारांनी मात्र पुन्हा पक्षप्रमुख एडप्पाडी के. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
राजीनामा देणाऱ्यांमध्ये मदुरंतकमच्या मरगथम कुमारवेल, धारापूरमच्या पी. सत्यभामा आणि पेरुंदुराईचे एस. जयकुमार या आमदारांचा समावेश आहे. त्यांनी सचिवालयात विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन राजीनामे सुपूर्द केले. राजीनाम्यानंतर तिन्ही आमदारांनी ‘टीव्हीके’चे मंत्री आधव अर्जुन यांची भेट घेतली. त्यामुळे ‘टीव्हीके’मध्ये ते प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विश्वासदर्शक ठरावावेळी पक्षाच्या आदेशाविरोधात जाऊन ‘टीव्हीके’ सरकारच्या बाजूने मतदान करणाऱ्या २५ आमदारांमध्ये या तिघांचा समावेश होता. तर, षण्मुगम-वेलुमणी गटातील पाच आमदारांनी पुन्हा पलानीस्वामी यांना पाठिंबा दिल्याने विधानसभेत त्यांच्या समर्थक आमदारांची संख्या १७ वर पोहोचली आहे.
भुवनेश्वर : बिजू जनता दलाचे (बीजेडी) राज्यसभा खासदार देबाशीष समंतराय यांनी सोमवारी पक्षासह खासदारकीचाही राजीनामा दिला. पक्षात आपल्याला पद्धतशीरपणे डावलले जात असल्याचा आरोप करत हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. ‘बीजेडी’प्रमुख नवीन पटनाईक यांचे सहकारी समंतराय लवकरच भाजपत प्रवेश करतील. यासंदर्भात भाजप नेतृत्वाशी अंतिम चर्चा पूर्ण झाली आहे. अनेक वर्षे पटनाईक यांचे निकटवर्तीय असूनही पक्षप्रमुखांची भेट घेण्यापासून रोखले गेले, असा आरोप समंतराय यांनी केला. २०२४च्या विधानसभा निवडणुकीतील ‘बीजेडी’च्या पराभवासाठी त्यांनी माजी नोकरशहा-राजकारणी व्ही. के. पांडियन यांना जबाबदार धरले.





