मोदी म्हणजे ‘महागाई मॅन’

महाराष्ट्र टाइम्स

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. यावरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. मोदींना 'महागाई मॅन' म्हटले जात आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर इंधनाच्या दरात वारंवार वाढ होत आहे. यामुळे ग्राहकांवर आर्थिक बोजा पडत आहे. काँग्रेसने समाज माध्यमांवरून सरकारवर टीका केली आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्यात सरकार अपयशी ठरले आहे.

मोदी म्हणजे ‘महागाई मॅन’
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

पेट्रोल-डिझेलच्या किंमती अकरा दिवसांत चौथ्यांदा वाढविण्याचा दणका सोमवारी बसल्यावर काँग्रेसने इन्स्टाग्राम व एक्सवरून सरकारवर पुन्हा टीकास्त्र सोडले व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘ महागाई मॅन’ची उपमा दिली. प्रमुख विरोधी पक्षाच्या नेतृत्वाने महागाईविरुद्ध समाज माध्यमांवरून आंदोलन सुरू ठेवले.

पाच राज्यांच्या निवडणुकींनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वारंवार वाढ करून मोदी यांचे सरकार ग्राहकांवर सतत आर्थिक बोजा टाकत आहे, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये राहुल यांनी पंतप्रधानांना ‘महागाई मॅन मोदी’ असे संबोधून त्यांच्यावर टीका केली आणि लोकांचा रोष शांत करण्यासाठी इंधनाच्या किंमती हप्त्या-हप्त्यांमध्ये वाढवल्या जात असल्याचा आरोप केला. ‘मी गेले अनेक महिन्यांपासून आर्थिक वादळाबद्दल बोलत आहे. परंतु, मोदी नेहमीप्रमाणे निवडणुकांमध्ये व्यग्र होते आणि निवडणुका संपताच त्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमती आठ रुपयांनी वाढवल्या. ही दरवाढ सुरूच राहणार आहे. महागाईचा सूत्रधार असलेल्या मोदींचे एकच काम आहे: निवडणुकीच्या काळात आश्वासने देणे व बाकी वेळ लोकांच्या खिशावर डल्ला मारणे, असे राहुल यांनी लिहिले.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही सरकारवर टीका केली. मोदी यांनी महागाई नियंत्रणातील आपले अपयश देशवासीयांसमोर जाहीरपणे मान्य केले पाहिजे. पेट्रोल आणि डिझेलवर दररोज हजार कोटी रुपयांचा केंद्रीय कर लावून भाजप समाधानी नाही. जेव्हा कच्च्या तेलाचे आंतरराष्ट्रीय दर कमी होते, तेव्हा त्यांनी लोकांना त्याचा लाभ न देता त्यांनी लूट केली. जेव्हा संकट आले, तेव्हा ते निवडणुकीत व्यग्र झाले आणि निवडणुकांनंतर त्यांनी उलट लोकांना त्यागाचा उपदेश केला. जेव्हा मोदी भारतीयांना सर्व काही ठीक असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा इटली, ब्रिटन, जर्मनी, आयर्लंडसारखे देश आपल्या लोकांना मदत करत होते, असे खर्गे म्हणाले.

मोदी नुकतेच पाच देशांत चक्कर मारून आले अशी टीका करून खर्गे म्हणाले की, ‘मोदी विदेशात जाऊन स्वतःला पुरस्कार देववून घेतात. परंतु त्या देशाशी झालेल्या करारातून किती गुंतवणूक आली याबद्दल सरकार गुप्तता पाळते. मोदी यांना महागाई नियंत्रणात ठेवण्यात मोठे अपयश आले आहे हे त्यांनी देशासमोर जाहीरपणे मान्य केले पाहिजे.’