काठमांडू : नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान शेर बहादूर देउबा आणि त्यांच्या पत्नी अर्जू राणा देउबा यांना मनी लाँडरिंग प्रकरणात अटक करण्यास मनाई करणारा अंतरिम आदेश जारी केला. न्यायमूर्ती महेश शर्मा पौडेल आणि नित्यानंद पांडे यांच्या खंडपीठाने दाम्पत्याने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना काठमांडू जिल्हा न्यायालयाने जारी केलेल्या अटक वॉरंटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
९१ यात्रेकरूंचा मृत्यू
डेहराडून : उत्तराखंडमधील सुरू असलेल्या चारधाम यात्रेच्या पहिल्या पाच आठवड्यांत आरोग्यविषयक कारणांमुळे एकूण ९१ यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. चारधाम यात्रा १९ एप्रिलपासून सुरू झाली. बद्रीनाथ येथे २४, यमुनोत्री येथे १३, तर गंगोत्री येथे यात्रेच्या पहिल्या पाच आठवड्यांत १० मृत्यू नोंदवले गेले.
‘एनएचआरसी’ला नोटीस
भोपाळ : रेवा येथे रस्ते अपघातात दोन साध्वींच्या मृत्यूप्रकरणी जैन समाजाने सोमवारी मध्य प्रदेशच्या अनेक भागांत आंदोलने केली. राज्य सरकारने या प्रकरणी ‘एनएचआरसी’ला नोटीस बजावली. जैन समाजाच्या सदस्यांनी भोपाळ, इंदूर, रेवा, सतना, मैहर, विदिशा, गुना, रतलाम, देवास, छतरपूर, पन्ना या शहरांसह मुंबई आणि सुरत येथेही निदर्शने केली.
माजिठा ‘आप’मध्ये
चंडीगड : अकाली दलाचे नेते व माजी राज्यसभा खासदार राजमोहिंदर सिंग माजिठा सोमवारी येथे ‘आप’मध्ये सामील झाले. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी माजिठा यांचे स्वागत केले. राजमोहिंदर सिंग माजिठा यांच्यासह माजी आरटीआय आयुक्त हेमिंदर सिंग माजिठा व चीफ खालसा दिवानचे सदस्य सुखदीप सिंग माजिठा हेही ‘आप’मध्ये दाखल झाले.
तीन मुले बुडाली
हमीपूर : उत्तर प्रदेशमधील हमीपूर जिल्ह्यात तलावात अंघोळ करताना तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. खंडेह गावातील प्रबल यादव (वय १०), आदित्य कुशवाह (९) व भोला कुशवाह (१०) हे तिघे सोमवारी सकाळी राम जानकी मंदिराजवळील तलावात गेले होते. दरम्यान त्यांना तलावाच्या खोलीचा अंदाज आला नाही.
उपनिरीक्षकाला अटक
जयपूर : राजस्थानच्या श्री गंगानगर जिल्ह्यात २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी एका पोलिस उपनिरीक्षकाला अटक केली. तो न्यू मंडी घडसाना पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. त्याला बिकानेर युनिटने कारवाईत रंगेहाथ पकडले.





