सोलापूर : सोलापूर शहरातील पुणे नाका ते मार्केट यार्ड मार्गावर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन मित्रांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मार्केट यार्डच्या दिशेने निघालेल्या भरधाव कारने रस्त्यावर थांबलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्यामुळे कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला; तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कारमधील अन्य दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.
शेखर सुरेकर (वय ३०, रा. कुमठा नाका, सोलापूर), अमोल धैर्यशील येरटे (वय ४०, रा, दाळगे प्लॉट, भवानी पेठ, सोलापूर) यांचा मध्यरात्रीच अपघातात मृत्यू झाला; तर कादर सैदू हांडे (रा. कुमठा नाका) याचा गुरुवारी सकाळी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. स्वरूप कोथिंबिरे (वय २७, जुनी मिल चाळ, सोलापूर ) आणि अमित राजेश जाधव (वय ३०, रा. सोलापूर) हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.





