दक्षिण मुंबईत पाणीबाणी

महाराष्ट्र टाइम्स

दक्षिण मुंबईत पाणीबाणी निर्माण झाली आहे. डॉ. ई. मोझेस मार्गावरील मुख्य जलवाहिनीला तडा गेल्याने पाणीपुरवठा खंडित झाला. ग्रँट रोड, गिरगाव, भायखळा, वरळीसह अनेक भागांत नागरिकांना पाण्यावाचून त्रास सहन करावा लागला. महापालिकेने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. गळतीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अनेक भागांत पाणीपुरवठा पूर्णतः बंद किंवा कमी दाबाने करण्यात आला.

दक्षिण मुंबईत पाणीबाणी
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

डॉ. ई. मोझेस मार्गावरील फेमस स्टुडिओसमोर असलेल्या १६५० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला तडा जाऊन मोठ्या प्रमाणावर गळती झाल्याने दक्षिण मुंबईतील अनेक भागांत बुधवारी रात्रीपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला. परिणामी, ग्रँट रोड, गिरगाव, मलबार हिल, भायखळा, वरळी, प्रभादेवी, लोअर परळ आणि करी रोड परिसरातील नागरिकांना गुरुवारी दिवसभर पाण्याअभावी हाल सहन करावे लागले.

महापालिकेच्या जलअभियंता विभागाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले असले, तरी गळती मोठी असल्याने दुरुस्तीस वेळ लागत असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ज्या ठिकाणी जलवाहिनी फुटली, त्या परिसरात कोणतेही खोदकाम किंवा बांधकाम सुरू नसल्याने गळतीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

गळतीमुळे डी, ई आणि जी दक्षिण या तीन वॉर्डांतील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः बंद किंवा कमी दाबाने करण्यात आला. डी वॉर्डमधील लॅमिंग्टन रोड, एम. एस. अली रोड, जे बोमन बेहराम मार्ग, आर. एस. निमकर मार्ग, ग्रँट रोड (पूर्व), बलराम स्ट्रीट तसेच संपूर्ण मुंबई सेंट्रल-ताडदेव परिसरात पाणीपुरवठा बंद राहिला. या वॉर्डातील ठाकूरद्वार, एम. के. रोड, खाडिलकर रोड, गिरगाव रोड, बाबुलनाथ रोड आणि चौपाटी परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात आला.

ई वॉर्डमधील के. के. मार्ग, बी. जे. मार्ग, साने गुरुजी मार्ग, कस्तुरबा रुग्णालय परिसर, मौलाना आझाद रोड, डॉ. आनंदराव नायर रोड, मराठा मंदिर रोड, मेघराय सेठी मार्ग, मोहम्मद शहीद मार्ग आणि कामाठीपुरा पहिली ते १४वी गल्ली अशा अनेक भागांत पाणीपुरवठा पूर्णतः ठप्प झाला होता. जी दक्षिण वॉर्डातील जे. आर. बोरीचा मार्ग, धोबीघाट आणि साने गुरुजी मार्ग परिसरालाही याचा फटका बसला. मात्र काही भागांत महापालिकेकडून टँकरद्वारे पुरवठा करण्यात आला.