नि:स्पृह कार्यकर्ते घडावेत

महाराष्ट्र टाइम्स

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पहिला भाऊसाहेब चांद्रायण स्मृती पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला. या पुरस्काराने विकास, संशोधन आणि सार्वजनिक जीवनातील योगदानाला सन्मानित केले जाते. भाऊसाहेब चांद्रायण यांच्यासारख्या नि:स्पृह कार्यकर्त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. या कार्यक्रमात 'सामान्यातील असामान्य भाऊसाहेब' या पुस्तकाचेही प्रकाशन झाले. कामगार चळवळीतील कार्यकर्त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यात आले.

नि:स्पृह कार्यकर्ते घडावेत
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

‘भारतीय मजदूर संघाच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम केले. भाऊसाहेब चांद्रायण यांच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हा आनंदाचा क्षण आहे. त्याचवेळी, त्यांच्यासारख्या अनेक नि:स्पृह कार्यकर्त्यांनी बाळगलेल्या आकांक्षा आणि उद्दिष्टांच्या पूर्तीची जबाबदारीची जाणीव करून देणारा हा पुरस्कार आहे’, अशी भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

सेंटर फॉर डेव्हलपमेंट रिसर्च, नागपूरतर्फे आयोजित पहिला भाऊसाहेब चांद्रायण स्मृती पुरस्कार २०२६ नितीन गडकरी यांना रविवारी प्रदान करण्यात आला. चिटणवीस सेंटर येथे झालेल्या कार्यक्रमात डॉ. कपिल चांद्रायण लिखित ‘सामान्यातील असामान्य भाऊसाहेब’ या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले. हा पुरस्कार विकास, संशोधन आणि सार्वजनिक जीवनात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर होते. व्यासपीठावर लेखक डॉ. कपिल चांद्रायण आणि दिलीप चांद्रायण उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर गडकरी म्हणाले, ‘भाऊसाहेब चांद्रायण यांच्यावर दत्तोपंत ठेंगडी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मोठा प्रभाव होता. कामगार संघटनांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन नेहमीच सकारात्मक होता. कामगार चळवळ संघटित, शिस्तबद्ध आणि समाजाभिमुख असली पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. मी भाजपचा विधान परिषद सदस्य असतानाही भारतीय मजदूर संघाचा अध्यक्ष होतो. दत्तोपंत ठेंगडी यांनी मला तसे करण्याची परवानगी दिली होती. पुढे मी इंटकचा राज्याध्यक्षही झालो. बँका, सरकारी कार्यालये आणि संघटित क्षेत्रात कामगार संघटनांना मिळालेले यश हे अशा कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानामुळेच शक्य झाले.’

सिरपूरकर यांनी आपल्या भाऊसाहेब चांद्रायण स्मृती पुरस्कारासाठी नितीन गडकरी यांची निवड सर्वार्थाने योग्य असल्याचे सांगितले. डॉ. कपिल चांद्रायण यांनी प्रास्ताविकातून या पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट केली. सूत्रसंचालन नूपुर देशपांडे यांनी केले. ॲड. शांतनू जोग यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला चांद्रायण कुटुंबीय, सामाजिक कार्यकर्ते , संशोधक, सार्वजनिक जीवनातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.