‘संरक्षण स्वावलंबना’वर मुंबईत मंथन

महाराष्ट्र टाइम्स

मुंबईत संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनावर चर्चा होणार आहे. 'मेक इन इंडिया'च्या पुढील टप्प्यासाठी ही चर्चा महत्त्वाची ठरेल. भारतीय उद्योगांना संरक्षण क्षेत्रात मोठ्या संधी मिळणार आहेत. येत्या दशकात १० लाख कोटी रुपयांच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. या चर्चासत्रात अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत.

‘संरक्षण स्वावलंबना’वर मुंबईत मंथन
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

‘ मेक इन इंडिया ’च्या पुढील टप्प्याकडे वाटचाल करताना संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबन आणि भारतीय उद्योगांसाठी निर्माण होणाऱ्या मोठ्या संधी या विषयावर मुंबईत उच्चस्तरीय चर्चा रंगणार आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ब्रह्मा रिसर्च फाउंडेशनतर्फे आज, ११ मे रोजी वांद्रे येथील ताज लँड्स एंडमध्ये ‘संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता : एमएसएमईंसाठी संधी ’ या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतीय नौदलाच्या सहकार्याने होणाऱ्या या कार्यक्रमाचा मुख्य विषय ‘मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड’ असा असून, संरक्षण उत्पादन क्षेत्रातील वाढत्या स्वदेशीकरणाच्या पार्श्वभूमीवर लघु व मध्यम उद्योगांसाठी उपलब्ध होत असलेल्या मोठ्या व्यवसाय संधींवर यात चर्चा होणार आहे. येत्या दशकात संरक्षण क्षेत्रात भारतीय एमएसएमईंसाठी तब्बल १० लाख कोटी रुपयांच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.

या चर्चासत्रात संरक्षण क्षेत्रातील वरिष्ठ लष्करी अधिकारी, धोरणकर्ते, जागतिक संरक्षण उत्पादक कंपन्या आणि वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. महाराष्ट्राचे आयटी आणि एआय मंत्री अ ॅड. आशीष शेलार याचे उद्घाटन करणार असून, ‘संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता’ या विषयावरील विशेष पुस्तिकेचेही प्रकाशन यावेळी होणार आहे.

एल अँड टी डिफेन्स, माझगाव डॉक, सॅफ्रन इंडिया आणि थायसेनक्रुप मरीन सिस्टम्स यांसारख्या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी परिसंवादात सहभागी होणार आहेत. भारतीय नौदलाच्या स्वदेशीकरण मोहिमेपासून ते जागतिक पुरवठा साखळीत भारतीय उद्योगांना स्थान मिळवून देण्यापर्यंत विविध विषयांवर सखोल चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे, पुढील नौदलप्रमुख व्हाइस अ ॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन प्रथमच सार्वजनिक व्यासपीठावर संबोधन करणार असल्याने या चर्चासत्राकडे विशेष लक्ष लागले आहे.