इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ही डॉक्टरांची केवळ एक संघटना नसून ती समाज आणि वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाचा दुवा आहे. येणाऱ्या काळात अधिक सक्षम, पारदर्शक आणि रुग्णांप्रती संवेदनशील असलेली आयएमए उभारण्याला माझे प्राधान्य राहील. सध्याच्या काळात डॉक्टरांवर होणारे हल्ले आणि त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांना मानसिक आणि कायदेशीर बळ देण्याचे काम आयएमए करेल, असे वक्तव्य नवनियुक्त अध्यक्ष डॉ. सचिन गाठे यांनी व्यक्त केले.
‘ डॉक्टर हा समाजाचा कणा आहे. रुग्ण डोळे झाकून डॉक्टरांवर विश्वास ठेवतात. माणसाच्या आयुष्यात जन्मानंतर मिळणाऱ्या जन्म प्रमाणपत्रापासून ते मृत्यू प्रमाणपत्रापर्यंत डॉक्टरांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे डॉक्टरांसाठी वैद्यकीय क्षेत्र हे केवळ एक पेशा नसून ती समाजसेवेची मोठी संधी आहे’, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या. अनिल किलोर यांनी रविवारी व्यक्त केले.
इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), नागपूर शाखेच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ उत्तर अंबाझरी मार्गावरील आयएमएच्या सभागृहात झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून न्या. किलोर बोलत होते. व्यासपीठावर आयएमएचे मावळते अध्यक्ष डॉ. राजेश सावरबांधे, सचिव डॉ. जितेंद्र साहू, नवनियुक्त अध्यक्ष डॉ. सचिन गाठे, सचिव डॉ. अंजली भांडारकर, आयएमएचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक अढाव, डॉ. मंजूषा गिरी आदींची उपस्थिती होती. यावेळी न्या. किलोर यांच्या हस्ते नवनियुक्त अध्यक्ष, सचिव व सर्व सदस्यांना गुलाबपुष्प, शाल, श्रीफळ व पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
न्या. किलोर म्हणाले, ‘डॉक्टरांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. रुग्णासोबत उपचारानंतर काही अनुचित घडून आल्यास नातेवाईक डॉक्टरांना दोष देतात. यातूनच पुढे डॉक्टरांवरील हिंसाचारासारखे प्रकार घडून येतात, ते अत्यंत चुकीचे आहे. करोना महामारीच्या काळात डॉक्टरांनी लोकांच्या आरोग्यसेवेत दिलेले योगदान कधीही विसरले जाणार नाही. लोक न्यायालयात न्यायासाठी येतात, तर डॉक्टरांकडे जीवनासाठी येतात.’





