शिक्षक भरतीला ‘मुदतवाढ’

महाराष्ट्र टाइम्स

मुंबई विद्यापीठाने शिक्षकांच्या भरती प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. उमेदवारांचा प्रतिसाद पाहता अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि संचालक पदांसाठी ही भरती आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्जासोबत कागदपत्रांचे तीन संच १५ मे पर्यंत विद्यापीठाच्या आवक विभागात जमा करावेत.

शिक्षक भरतीला ‘मुदतवाढ’
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

मुंबई विद्यापीठाच्या विनाअनुदानित विभागांतील शिक्षकांच्या विविध पदांच्या भरती प्रक्रियेला उमेदवारांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याने अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि संचालक पदांसाठी इच्छुक उमेदवारांना आता ११ मेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

मुंबई विद्यापीठाअंतर्गत, माहिती तंत्रज्ञान, संगणकशास्त्र, नाट्यकला, आंतरराष्ट्रीय संबंध आणि अर्थशास्त्र आदी विभागांतील विविध पदांचा या भरती प्रक्रियेत समावेश आहे. यापूर्वी यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २ मे होती. मात्र, उमेदवारांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला.

विद्यापीठाचे आवाहन

इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्जासोबतच अर्जाची छापील प्रत आणि आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांचे तीन संच फोर्ट परिसरातील विद्यापीठाच्या आवक विभागात १५ मे रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर करता येणार आहेत. सुधारित वेळापत्रकानुसार सर्व उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन मुंबई विद्यापीठ प्रशासनाने या भरती प्रक्रियेबाबत केले असून त्यानंतर पुढील निर्णय होणार आहे.