हरवलेली पर्स मिळाली परत

महाराष्ट्र टाइम्स

वैजापूर पोलिसांनी एका महिलेची हरवलेली पर्स शोधून परत केली. ज्योती होन या शिवराई येथील महिला वैजापूरमध्ये खरेदी करत असताना त्यांची पर्स हरवली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास केला. लहानू जाधव यांनी ही पर्स पोलिसांकडे जमा केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत पर्स महिलेला सुपूर्द केली. या कामगिरीमुळे पोलिसांचे कौतुक होत आहे.

हरवलेली पर्स मिळाली परत
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या महिलेचा हरवलेला ऐवज वैजापूर पोलिसांनी तत्परतेने तांत्रिक तपासाच्या आधारे शोध लावून महिलेला सुपूर्द केला. शुक्रवारी सायंकाळी उशिरा वैजापूर पोलिसांनी ही कामगिरी केली. याबद्दल ज्योती होन (रा. शिवराई) या महिलेने पोलिसांचे आभार मानले आहेत; तसेच पोलिसांचेही सर्व स्तरावर कौतुक होत आहे.

ज्योती होन शिवराई येथील रहिवासी आहेत. शुक्रवारी दुपारी वैजापूर शहरातील आंबेडकर चौक ते झगडा फाटा परिसरात असलेल्या बाजारपेठात त्या साहित्य खरेदी करत होत्या. या वेळी त्यांचे रोख रक्कम व काही दागिने असलेले पाकीट हरवले. त्यांनी तत्काळ वैजापूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या आदेशाने सीसीटीव्ही अंमलदार किरण रावते यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तपासादरम्यान झगडा फाटा येथे पाकीट पडल्याचे पोलिसांना दिसले. हे पाकीट मोटारसायकलवरील व्यक्तीस सापडल्याचे समजले. लगेचच पोलिसांनी ‘त्या’ वाहन क्रमांकाच्या आधारे संबंधित व्यक्तीचा शोध घेतला. लहानू जाधव (रा. खोपडी) यांनी ते पाकीट सापडल्यावर पोलिसांकडे जमा केल्याची माहिती दिली. पोलिस अंमलदार किरण रावते यांनी लहानू जाधव यांच्याकडून पाकीट ताब्यात घेतले.