काही आठवड्यांत सुरू होणाऱ्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये ४८ संघांत चुरस असेल. हा स्पर्धेचा मोठा विस्तार मानला जात आहे. मात्र, चार वर्षांनी म्हणजेच २०३०मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत ६६ देशांत चुरस होण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर ही स्पर्धा सहा देशांत होण्याची शक्यता आहे.
काही महिन्यापूर्वी कॉन्मेबॉल (दक्षिण अमेरिकेतील देशांची संघटना) महासंघाने वर्ल्ड कप स्पर्धेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्याची सूचना केली होती. त्या वेळी काही स्पर्धांनंतर याचा विचार होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, काही आठवड्यांपासून २०३०ची स्पर्धा ६६ संघांची करावी ही सूचना जोर धरत आहे. फुटबॉल वर्ल्ड कपच्या अंतिम टप्प्यातील संघ वाढल्यास त्याचा खेळाच्या लोकप्रियतेस; तसेच स्पर्धेचे महत्त्व वाढण्यास उपयोग होईल, असे अनेकांचे मत आहे. केप वेर्दे, कुराकाओ, उझबेकिस्तान, जॉर्डन हे २०२६च्या वर्ल्ड कपला पात्र ठरले आहेत. ते प्रथमच या स्पर्धेत खेळणार आहेत. अंतिम टप्प्याच्या स्पर्धेतील देश वाढल्यास प्रथमच खेळणारे संघ वाढतील आणि खेळही जास्त वाढेल असे गणित आहे.
चार वर्षांनी म्हणजेच २०३०मध्ये होणारी स्पर्धा स्पेन, पोर्तुगाल आणि मोरोक्को संयुक्तपणे संयोजित करतील. मात्र त्याचबरोबर अर्जेंटिना, पॅराग्वे आणि उरुग्वेला सहयजमान करुन घेण्याचा विचार आहे. सामन्यांची संख्या वाढल्यास स्टेडियम उभारणीचा खर्च वाढेल असा इशारा दिला जात आहे. अर्थात ३२वरून ४८ आणि त्यानंतर ६६ ही संघाची वाढ करण्याचा अंतिम निर्णय यंदाच्या स्पर्धेची सांगता झाल्यावरच होईल.






