बिगर-कृषी क्षेत्रातील असंघटित आस्थापनांची संख्या नऊ कोटींहून अधिक झाली असून, यावर्षी जानेवारी ते मार्च या तिमाहीत या उद्योगांमधील रोजगार १५ कोटींचा टप्पा ओलांडून गेले आहेत. ही माहिती राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) ताज्या अहवालात गुरुवारी दिली. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयांतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने असंघटित बिगर-कृषी क्षेत्राचे त्रैमासिक अंदाजही यावेळी जाहीर केले.
एनएसओ २०२५ पासून असंघटित बिगर-कृषी क्षेत्रातील प्रमुख निष्कर्षांवर त्रैमासिक बुलेटिन प्रकाशित करत आहे. जानेवारी ते मार्च २०२६ साठीचे असंघटित क्षेत्र उद्योगांवरील त्रैमासिक बुलेटिन (क्यूबीयूएसई) म्हणजे असंघटित क्षेत्र उद्योगांच्या वार्षिक सर्वेक्षणाचे (एएसयूएसई) त्रैमासिक निष्कर्ष आहेत. क्यूबीयूएसईची सुरुवात ही देशाच्या अर्थव्यवस्थेतील सर्वाधिक गतिमान विभागांपैकी एक असलेल्या क्षेत्राबाबत धोरणकर्ते, संशोधक आणि इतर भागधारकांना वेळेवर व उपयुक्त माहिती देण्यासाठी झाली आहे.
असे झाले सर्वेक्षण
अखिल भारतीय स्तरावर जानेवारी २०२६ ते मार्च २०२६ या तिमाहीत ५,९९८ प्रथम टप्प्यातील घटकांचे (ग्रामीण क्षेत्रातील २,४०८ गावे आणि शहरी क्षेत्रातील ३,५९० यूएफएस ब्लॉक्स) सर्वेक्षण करण्यात आले. यात अंदमान व निकोबार बेटे, लक्षद्वीप, लडाख आणि अरुणाचल प्रदेश व नागालँडच्या ग्रामीण भागांतील एफएसयूंचा समावेश करण्यात आलेला नाही. आस्थापनांची संख्या २४.८२ टक्क्यांनी वाढली, तर याच कालावधीत क्षेत्रातील कर्मचारी वर्ग ३१.१३ टक्क्यांनी वाढला. असंघटित क्षेत्रात महिला कर्मचारी वर्ग प्रभावशाली राहिला असून तो क्षेत्रातील एकूण रोजगाराच्या सुमारे २९ टक्के आहे.






