औरंगाबाद-जालना स्थानिक प्राधिकारी विधान परिषद द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, यासाठी १८ जून रोजी मतदान आहे. निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सविता चौधरी उपस्थित होते.
अडकुणे यांनी म्हणाले, ‘निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर हे निवडणूक निर्णय अधिकारी असतील. छत्रपती संभाजीनगर व जालना यांचे निवासी उपजिल्हाधिकारी हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असतील. या निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेवर निवडून आलेले व नियुक्त सभासद हे मतदान करू शकतील. त्यात महापालिका, नगर पालिका, नगरपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापती यांचा समावेश असेल. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, मुख्याधिकारी यांच्याकडून मतदारांची यादी प्राप्त होईल. मतदारयादी प्रसिद्ध झाल्यावर त्यावर हरकती मागवण्यात येतील. त्यावर सुनावणी होईल व त्यानंतर मतदारयादी अंतिम करण्यात येईल. निवडणूक आचारसंहिता लागू झाली असून, आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.







