जून १९८६. मुंबई सेंट्रल स्थानकाच्या फलाटावर एक तरुण उतरला. हातात एक बॅग आणि एक व्हायोलिन. तो त्याच्या मागे गोव्याचे आयुष्य सोडून आला होता, ते केवळ एका स्वप्नासाठी... पंडित डी. के. दातार यांच्याकडून हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी. पुढे त्याच तरुणाने गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या सान्निध्यात तब्बल २१ वर्षे साधना केली आणि भारतीय शास्त्रीय संगीतात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केलं. तो तरुण म्हणजे पंडित मिलिंद रायकर .
पं. रायकर यांच्या ६१व्या जन्मदिनानिमित्त २७ मे रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात ‘गुरुवंदना’ हा विशेष सोहळा रंगणार आहे. रायकर म्युझिक फाउंडेशनतर्फे आयोजित या कार्यक्रमात ‘व्हायोलिनचे रंग’ ही ४२ व्हायोलिन, व्हायोला, चेलो, ड्रम्स, बास गिटार आणि विविध पाश्चात्य वाद्यांच्या संगमातून साकारलेली भव्य सिम्फनी सादर होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून काही जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात यज्ञेश रायकर यांच्या व्हायोलिन वादनाने होईल. त्यांना सत्यजित तळवळकर तबल्यावर साथ करणार आहेत. यानंतर पद्मश्री पंडित सुरेश तळवळकर आणि पद्मश्री विदुषी अश्विनी भिडे देशपांडे यांच्या हस्ते पंडित मिलिंद रायकर यांचा गौरव करण्यात येणार आहे.
या सोहळ्यात ‘पद्मश्री पंडित डी. के. दातार पुरस्कार’ पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरासिया यांना प्रदान करण्यात येणार आहे. गुरू-शिष्य परंपरेचा सन्मान करणारा हा सोहळा मुंबईच्या संगीतविश्वासाठी एक संस्मरणीय पर्व ठरणार आहे.







