(पान एकवरून)
यांनी शेअर करीत या कारवाईबद्दल माहिती दिली. त्यानंतर काही वेळेतच दिपके यांनी ‘कॉक्रोच इज बॅक’ नावाने नवे खाते सुरू केले. या खात्याचे काही तासांत ४० हजार फॉलोअर्स होते. ‘कॉक्रॉचेस डोन्ट डाय’ असे या खात्याच्या प्रोफाइलमध्ये नमूद करण्यात आले असून, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणारी पोस्ट करण्यात आली आहे.
दिपके यांनी या कारवाईवरून सरकारला लक्ष्य केले. ‘‘ सीजेपी ’ला मोठा प्रतिसाद मिळत असून, ही ‘चळवळ’ वेगाने वाढत आहे. त्यामुळेच सरकारला भीती वाटली असावी’, असे दिपके यांनी म्हटले आहे. ‘सीजेपी’च्या मुख्य खात्यावर कारवाई झाली असली तरी ‘द कॉक्रोच युथ’, ‘कॉक्रॉच न्यूज’, ‘आयएम कॉक्रोच’, ‘कॉक्रोच पार्टी ऑफ इंडिया’ आणि ‘कॉक्रोच जनता पार्टी (जेन झी)’ ही ‘एक्स’वरील खाती सुरूच होती. ‘सीजेपी’चे इस्टाग्राम पेज सुरूच असून, गुरुवारी त्यावर १५.६ दशलक्ष फॉलोअर्स होते. अनेकांनी भाजपच्या अधिकृत ‘इन्स्टाग्राम’ खात्यावरील ८.८ दशलक्ष आणि काँग्रेसच्या १३.३ दशलक्ष फॉलोअर्सपेक्षा ‘सीजेपी’ला अल्पावधीतच अधिक प्रतिसाद मिळाल्याचे संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित केले.
‘सीजेपी’ काय आहे?
वरिष्ठ पदासाठी याचिका करणाऱ्या वकिलाला फटकारताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी ‘परजीवी’ आणि ‘ झुरळ ’ असे शब्दप्रयोग १५ मे रोजी केले होते. ‘कोणताही रोजगार मिळत नसेलेले हे तरुण झुरळाप्रमाणे हल्ले सुरू करतात’, असे विधान करून सरन्यायाधीशांनी बेरोजगारांची तुलना झुरळाशी केल्याचा आरोप करीत काही तरुणांनी दुसऱ्याच दिवशी समाजमाध्यमांवरून त्यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र, खोट्या आणि बनावट पदवीच्या आधारे वकिली पेशात घुसखोरी करणाऱ्यांबाबत हे विधान केल्याचे सांगत सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, १६ मे रोजी ‘सीजेपी’ हा उपरोधिक नावाने ही मोहीम डिजिटल मंचावर सुरू झाली आणि त्यास राजकारणी, कार्यकर्ते, युवा पिढीकडून मोठा प्रतिसाद मिळाला. ही ‘जेन झी’ची चळवळ असल्याचे अभिजीत यांचे म्हणणे आहे. अभिजीत हे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील असून, त्यांनी याआधी आम आदमी पक्षासोबत काम केले आहे. ते राजकीय संवाद रणनीतीकार आहेत.
राजकारण्यांनाही भुरळ
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ‘बीजेपी’ विरुद्ध ‘सीजेपी’ अशी पोस्ट ‘एक्स’ आणि ‘इन्स्टाग्राम’वर केली. आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी ‘आय टू अ कॉक्रोच’ अशी पोस्ट केली. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा, किर्ती आझाद यांनीही ‘सीजेपी’बद्दल स्वारस्य व्यक्त केले.
नावासाठी तीन अर्ज
नवी दिल्ली : ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या नाममुद्रेच्या हक्कासाठी तीन वेगवेगळे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. अझिम आदमभाई, अखंड स्वरूप या दोघांसह ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या मालकीद्वारे तिसरा अर्ज दाखल करण्यात आला आहे.







