मुंबई : ब्रेन्ट क्रूडचा घसरलेला दर, भू-राजकीय तणाव कमी होण्याची चिन्हे, तसेच रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपामुळे रुपया सर्वकालीन नीचांकी बंद पातळीवरून गुरुवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ४९ पैशांनी सावरला. एका डॉलरची किंमत ९६ रुपये ३७ पैसे झाली.
आंतरबँक परकीय चलन बाजारात रुपया डॉलरच्या तुलनेत ९६.२५ वर उघडला. दिवसभरात त्याने ९६.०५ चा उच्चांक आणि ९६.६० चा नीचांक गाठला. त्याआधी, गुरुवारच्या सत्राअखेरीस रुपया ९६.३७ वर बंद झाला होता. बुधवारी रुपयाने ९६.९५ चा विक्रमी नीचांक गाठला होता आणि नंतर ९६.८६ वर बंद झाला होता.
सहा चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद मोजणारा डॉलर निर्देशांक ०.२२ टक्क्यांनी वाढून ९९.३० वर व्यापार करत होता. जागतिक तेल बाजारात ब्रेन्ट क्रूडचा वायदा दर ०.७५ टक्क्यांनी घसरून प्रतिबॅरल १०४.२३ अमेरिकी डॉलरवर स्थिरावला.







