जलसंधारणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधत नागपुरात १७ आणि १८ मे रोजी दोन दिवसांच्या जलसंवाद व जलक्रांती परिषद आयोजित करण्यात आली आहे. देशभरातील दिग्गज जलतज्ज्ञ, पद्म पुरस्कार विजेते आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत. परिषदेचे मुख्य आकर्षण सिनेअभिनेते आमिर खान , नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे असतील.
दोन दिवसांच्या या जलक्रांती परिषदेबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, ‘पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्यावतीने वर्धा जिल्ह्यातील तामसवाडा येथे जलसंधारण ाचे जे कार्य केले आहे, ते देशातील अनेक गावांसाठी अत्यंत आदर्श ठरले आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांसाठी एक नवी उमेद निर्माण होण्याबरोबरच जलसंधारणाचे महत्त्वही पटवून देण्यास मदत झाली आहे. संस्था गेल्या २५ वर्षांपासून या क्षेत्रात कार्य करत असून त्यानिमित्त दोन दिवसांच्या जलक्रांती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेत पहिल्या दिवशी १७ मे रोजी दुपारी ४ वाजता डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेत ‘शेतकरी आत्महत्यामुक्त विदर्भासाठी जलसंधारण एक उपाय’ या विषयावर मंथन होणार आहे. विदर्भातील पाणीटंचाई आणि सिंचनाच्या समस्यांवर मात करून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या उद्देशाने या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.’
या परिषदेत देहरादून येथील पद्मभूषण डॉ. अनिल जोशी, चित्रकूट येथील पद्मश्री उमाशंकर पांडे, सहारनपूर येथील पद्मश्री सेठपाल सिंग हे तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. त्याचबरोबर आसामचे केशोब छत्रधारा, ‘सेंटर फॉर वॉटर पीस’चे संजय कश्यप, नागालँडच्या जलतज्ज्ञ स्वेडेविनो नात्सो या सहभागी होणार आहेत. या सत्राच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील. दुसऱ्या दिवशी १८ मे रोजी रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात सकाळी ११ वाजता जलक्रांती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात संस्थेच्या २५ वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेतला जाणार असून विदर्भातील ‘तामसवाडा पॅटर्न’सारख्या यशस्वी जलसंधारण प्रयोगांवर चर्चा होणार आहे. परिषदेचे प्रमुख आकर्षण सिनेअभिनेते आणि ‘पाणी फाउंडेशन’चे संस्थापक आमिर खान, ‘नाम’ फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर आणि सचिव मकरंद अनासपुरे यांची प्रमुख उपस्थिती राहील. या कार्यक्रमाला राज्याचे मृदा व जलसंधारणमंत्री संजय राठोड, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख आणि गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांचीही विशेष उपस्थिती राहील. जलक्रांती परिषदेसाठी विदर्भातील शेतकरी व सरपंच मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. यानिमित्त दुपारी २.३० वाजता जलसंवर्धन आणि भूजल पुनर्भरण या विषयावर चिंतन होणार आहे. या रौप्य महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने ‘जलपर्व’, ‘जलक्रांती’, ‘कृषिकल्याण’ आणि ‘कॉरिडॉर्स ऑफ वॉटर सीक्योरिटी’ या महत्त्वपूर्ण पुस्तकांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
पत्रपरिषदेला काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर, आमदार उमेश यावलकर, पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष दत्ताजी जामदार, सचिव माधव कोटस्थाने, अनिल सांबरे, सुमंत पुणतांबेकर, मनोहरराव कुंभारे, सचिन कुळकर्णी, सुधीर दिवे उपस्थित होते.





