राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने यंदाच्या पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल करत प्रथमच 'ऑनर्स' आणि ' ऑनर्स विथ रिसर्च ' या चौथ्या वर्षांच्या अभ्यासक्रमाचा पर्याय विद्यार्थ्यांसाठी खुला केला आहे. त्यामुळे पारंपरिक पदवीच्या पुढे संशोधनाभिमुख शिक्षणाची नवी वाट विद्यार्थ्यांसाठी खुली होणार आहे.
मुंबई विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग, संलग्नित आणि स्वायत्त महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला ९ मेपासून सुरुवात झाली असून, २६ मेपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. ३ जूनला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार असून, १३ जूनपासून नियमित वर्ग सुरू होणार आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता तीन वर्षांची पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना चौथ्या वर्षासाठी 'ऑनर्स' किंवा 'ऑनर्स विथ रिसर्च'मध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे. राज्यातीलच नव्हे, तर राज्याबाहेरील विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांनाही या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
विद्यापीठाच्या [https://muadmission.samarth
.edu.in](https://muadmission.
samarth.edu.in) या वेबसाइटवरून विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार असून, प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत असल्याचा दावा विद्यापीठ प्रशासनाने केला आहे. याशिवाय एक वर्षीय पीजी डिप्लोमा आणि दोन वर्षीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठीही प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, एमएमएस, एमसीए, एमटेक आणि एमई या एआयसीटीईअंतर्गत अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलच्या निकालानंतर राबविण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.





