आपले अणुविषयक ज्ञान आणि सामर्थ्य वाढवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न भारत करीत आहे, असे पंतप्रधान इंदिरा गांधी आणि परराष्ट्रमंत्री स्वर्णसिंग यांनी आज लोकसभेत सांगितले. कोणत्याही परिस्थितीत भारत अणुबाँब तयार करणार नाही, असे सरकार घोषित करील काय, या प्रश्नावर मात्र पंतप्रधानांनी किंवा परराष्ट्र मंत्र्यांनी थेट उत्तर दिले नाही. चीनने तिसरा अणुस्फोट केल्यामुळे आज अनेक सदस्यांनी लक्षवेधी ठराव मांडले, त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना राष्ट्राचे अणुविषयक सामर्थ्य वाढविण्याचा सरकारचा निर्धार व्यक्त केला. इंदिरा गांधी म्हणाल्या की, हे प्रयत्न आणि शांततापूर्ण उद्दिष्टांसाठीच आहेत. अणुशक्तीचा विकास, वापर याद्वारा चीनच्या अण्वस्त्र विषयक धमकीच्या संदर्भात भारताचे ‘विधायक धोरण’ कोणते आहे, हे प्रतीत होत आहे. चीन अणुबाँब घेऊन कोणत्याही राष्ट्रावर स्वत:ला काहीही अपाय न होता हल्ला करू शकेल, ही कल्पनाही चुकीची आहे.’ स्वर्णसिंग यांनी गांधींच्या या विधानांचे अधिक स्पष्टीकरण करत ‘आपले अणुज्ञान कमाल मर्यादेपर्यंत वाढवण्याचा इरादा आहे. स्वत: अणुबाँब करण्यापेक्षा अण्वस्त्र नि:शस्त्रीकरण वाटाघाटींना पाठिंबा देऊनच भारत जागतिक शांततेची सेवा करू शकेल, असे सरकारचे मत असल्याचे ते म्हणाले.
(११ मे, १९६६)





