ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकलेली ऊस बिलाची रक्कम, अदा करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने आंदोलन केले होते. पांगरी येथील ओंकार शुगर्स समोर सुरू केलेल्या सत्याग्रह आंदोलनास यश आले आहे. प्रशासनाने शेतकरी एकजुटी पुढे नमती भूमिका घेऊन १५ दिवसांत सर्व ऊस देयक अदा करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे शेतकरी संघर्ष समितीने हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.
पांगरी येथील ओंकार शुगर्स साखर कारखान्याने १५ जानेवारी नंतर गाळप केलेल्या शेतकऱ्यांच्या उसाचे पेमेंट दिले नव्हते. या विरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या सत्याग्रह आंदोलनाची प्रशासनाने धास्ती घेतली. आंदोलन सुरु केल्याने कारखान्याने एक हजार ८०० रुपये प्रति टन प्रमाणे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केलेली आहे.मात्र शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु ठेवल्याने कारखान्याने जाहीर केलेल्या दोन हजार ९५० प्रति टन दरापैकी उर्वरीत एक हजार १५० प्रति टन रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात २५ मेपर्यंत जमा करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. कारखाना प्रशासनाकडून जनरल मॅनेजर एस. व्ही. सोळंके यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना तसे पत्र दिले आहे. या वेळी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे नेते ॲड. अजय बुरांडे, ॲड. श्रीनिवास मुंडे, श्रीराम बडे, विनायकराव मुंडे, अरुण महाराज शिंदे, देविदास कराड, धोंडीबा दिवटे, अशोक शिंदे, दत्तात्रय तिडके, प्रभाकर मुंडे, मनोहर मुंडे, बिभीषण गित्ते, अविनाश मुंडे, शरद गित्ते सूर्यकांत तिडके यांच्या सह अनेक शेतकरी आंदोलक उपस्थित होते. कारखाना प्रशासनाच्या लेखी आश्वासनामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या लढ्याला यश मिळाले.





