आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी रविवारच्या मेगाब्लॉकची तमा न बाळगता रवींद्र नाट्य मंदिराच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात जमलेले पालक... दहावी-बारावीनंतर पुढे काय, या चिंतेत असलेले विद्यार्थी... विविध शिक्षण संस्थांच्या स्टॉल्सवर मिळणारी महत्त्वाची माहिती... आणि विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे उलगडलेल्या करिअरच्या विविध वाटा... ‘ महाराष्ट्र टाइम्स प्लॅनेट कॅम्पस एज्युकेशन एक्स्पो’चा दुसरा आणि शेवटचा दिवस पालक आणि विद्यार्थी यांच्या भरघोस प्रतिसादात पार पडला. कॉमर्समधील करिअरच्या संधींपासून सुरू झालेला दुसऱ्या दिवसाचा प्रवास संरक्षण दलांमधील करिअरच्या संधींपर्यंत पोहोचला.
दुसऱ्या दिवसाची सुरुवात दिशा कौन्सिलिंग सेंटरच्या पूनम घाडीगावकर यांच्या मार्गदर्शन सत्राने झाली. ‘कॉमर्स आणि मॅनेजमेंटमधील करिअर वाटा’ या विषयावरील सत्रात त्यांनी विविध अभ्यासक्रम, सीए, सीएस, सीएफए आदी महत्त्वाचे अभ्यासक्रम, बीबीए, बीसीए आदी व्यावसायिक अभ्यासक्रम यांच्या प्रवेशापासून ते यातील आव्हाने आणि करिअर संधींपर्यंतची माहिती दिली.
विद्यालंकार क्लासेस आणि पब्लिकेशन्सचे प्रा. श्रेयस नाईक यांनी ‘नामांकित इंजिनीअरिंग, मेडिकल आणि प्युअर सायन्सेस इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशाचा मार्ग’ याविषयी महत्त्वाची माहिती दिली. ‘आयआयटी’सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेशासाठी कशी तयारी करावी लागते, याबाबत त्यांनी केलेले मार्गदर्शन मोलाचे ठरले.
भोजनोत्तर सत्रात ‘आयपीएस’ अधिकारी मोक्षदा पाटील यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, याबाबत अत्यंत सहजसोप्या शैलीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यूपीएससी, एमपीएससी या फक्त परीक्षा नसून ती स्पर्धा आहे. तेथे तुम्हाला दुसऱ्याच्या पुढेच राहायचे असते, हे ठसवत त्यासाठी कोणत्या गोष्टी दहावीपासूनच करणे आवश्यक आहे, याबद्दलची मांडणी त्यांनी केली. सुरुवातीपासून अर्धा तास तरी अगदी लक्ष केंद्रीत करून अभ्यास केल्यास, वर्तमानपत्र वाचल्यास त्याचा फायदा होतो, असेही त्या म्हणाल्या. भारतीय वन सेवेच्या नुकत्याच लागलेल्या निकालांत भारतात ४४व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले अधीश तिवारी हे या सत्रासाठी उपस्थित होते. मोक्षदा पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
‘कला आणि भाषांमधील करिअर संधी’ या सत्रात मानसोपचारतज्ज्ञ आणि करिअर समुपदेशक डॉ. मानसी आमडेकर यांनी कला शाखेतील विभिन्न करिअर्सची ओळख करून दिली. ‘जोपर्यंत मानवजात आहे, तोपर्यंत मानव्यविद्या शाखांना मरण नाही. भारतीय भाषांमध्येही प्रचंड करिअरच्या संधी आहेत. तसेच या करिअरमध्ये प्रचंड वेतन देण्याचीही क्षमता आहे,’ असेही त्यांनी सांगितले.
शेवटच्या सत्रात लष्कराचे लेफ्टनंट कर्नल तेजस शिर्के यांनी सैन्यदलांची ओळख करून दिली. लष्कर, नौदल आणि वायू सेना यांच्या चित्रफिती दाखवत त्यांनी विद्यार्थ्यांचे कुतूहल जागे केले. सैन्यदलांत प्रवेश घेण्याचे लाभ काय असतात, सैनिकी अधिकाऱ्याचे आयुष्य कसे समृद्ध होऊ शकते, यांसह सैन्यदलांत प्रवेशासाठीच्या परीक्षा, पात्रता यांची माहिती देत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली.






