‘समाजजीवनात वावरताना एखाद्या महनीय व्यक्तीबद्दल सध्या शिक्षणमहर्षी, ऋषितुल्य, अजातशत्रू , नि:स्पृह कर्मयोगी, नि:स्वार्थी व्यक्तिमत्त्व अशी अनेक विशेषणे लावली जातात. मात्र, हे सर्व विशेषणे किंबहुना यापेक्षाही अधिक विशेषणांनी गौरविले जावे अशा व्यक्तिमत्त्वाचे धनी दिवंगत माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील हे होते,’ अशा शब्दांत ‘आपण समस्त लातूरकरांच्या’ यांच्या वतीने ‘ लातूर पॅटर्न 'चे आधारस्तंभ डॉ. गोपाळराव पाटील यांना रविवारी लातुरात भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
लातूरच्या दयानंद सभागृहात रविवार १० मे रोजी डॉ. हर्षवर्धन राऊत, डॉ. हरिप्रसाद सोमाणी, डॉ. अजय जाधव, धनंजय बेंबडे, ॲड. प्रदीप मोरे यांसह आपण समस्त लातूरकरांच्या वतीने सार्वजनिक श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी डॉ. गोपाळराव पाटील यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व उपस्थित मान्यवरांनी शिक्षण महर्षी, निःस्पृह कर्मयोगी डॉ. गोपाळराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
संभाजी पाटील निलंगेकर यांनी ‘डॉ. पाटील यांच्या जाण्याने आपण एका चांगल्या मार्गदर्शकाला कायम स्वरूपी मुकलो’ अशी भावना व्यक्त केली. आमदार विक्रम काळे म्हणाले, ‘शिक्षण क्षेत्रात आज लातूरची जी स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. ती लातूर पॅटर्नमुळे. या लातूर पॅटर्नचे जनक म्हणूनही डॉ. गोपाळराव पाटील कायमस्वरूपी ओळखले जाणार आहेत. एक आदर्श राजकारणी , आदर्श संस्थाचालक आणि आदर्श व्यक्तिमत्त्व असणाऱ्या डॉ. पाटील त्यांच्या जाण्याने केवळ लातूरचीच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्याची अपरिमित हानी झाली आहे.’ डॉ. अजय जाधव म्हणाले, ‘गोपाळराव पाटील यांचे संस्थेच्या उभारणीतील योगदान कदापि विसरण्याजोगे नाही.त्यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली संस्थेच्या रोपट्याचे महाकाय वटवृक्षात रूपांतर झाले आहे.’
नगरसेवक ॲड. प्रदीप मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना डॉ. गोपाळराव पाटील यांच्याकडून आपल्याला संपूर्ण जीवनभर पुरेल एवढी अनुभवाची शिदोरी मिळाल्याचे नमूद केले. लायन्स क्लबचे धनंजय बेंबडे म्हणाले,‘डॉ. गोपाळराव पाटील ‘हे मानवतेचे चालते बोलते विद्यापीठच होते, त्यांच्या सहवासात आलेली व्यक्ती जीवनभर त्यांच्या सहवासात वावरत असत.’
डॉ. गोपाळराव पाटील यांचे सुपुत्र सच्चिदानंद पाटील म्हणाले, ‘अप्पा जीवनमूल्याचे एक आदर्श विद्यापीठ होते. त्यांनी भारतीय जनता पार्टीकडून चार वेळेस लातूर लोकसभा निवडणूक लढवली. विजयाला गवसणी घालणे त्यावेळी शक्य झाले नसले तरी त्यांनी जरी लढाई हरली असली तरी युद्ध जिंकले होते. ते सकारात्मक दृष्टिकोन ठेवून लढत असत. पराजित झाले तरी शिवराज पाटील चाकूरकर यांचे मोठ्या मनाने अभिनंदनही करत असत. अप्पांनी मनात कधीच कटुता येऊ दिली नाही.’ प्रा. विद्याधर कांदे पाटील म्हणाले, ‘डॉ. गोपाळराव पाटील यांच्या जीवनावरील कर्मयोगी ग्रंथाचे लेखन करताना त्यांच्या जीवनकार्याचा अभ्यास झाला. त्यांच्या मनात कोणाबद्दलही द्वेष नव्हता. त्यांचे व्यक्तिमत्त्व माणुसकीने ओतप्रोत भरलेले होते.’
लक्ष्मीरमण लाहोटी, डॉ. हरिप्रसाद सोमाणी, स्नेहलता देशमुख, डॉ. बी.आर. पाटील, डॉ. मन्मथ भातांब्रे, शिवाजीराव भोसले, प्रा. गोविंदराव घार, ॲड.उदय गवारे, रागिणी यादव, प्रा. बापूसाहेब रितापुरे यांनीही डॉ. गोपाळराव पाटील यांना आदरांजली वाहिली. सूत्रसंचालन देवणीकर, धनंजय बेंबडे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. बाळासाहेब जाधव यांनी केले.





