आष्टी तहसील कार्यालय येथे मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेअंतर्गत प्रलंबित व अत्यावश्यक रस्ते कामांचा सविस्तर आढावा बैठक आमदार सुरेश धस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आष्टी, पाटोदा व शिरूर तालुक्यातील गाव व वस्ती जोडणाऱ्या अनेक रस्त्यांची कामे अनेक वर्षांपासून अपूर्ण आहेत. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची बाब बैठकीत समोर आली.
विशेषतः शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी आवश्यक असलेल्या पाणंद रस्त्यांची दयनीय अवस्था गंभीर असून ही कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना आ. सुरेश धस यांनी संबंधित विभागांना दिल्या. ज्या रस्त्यांवर अतिक्रमणे झाली आहेत ती तत्काळ हटवून रस्त्यांची हद्द निश्चित करावी, प्रलंबित मोजणी प्रक्रिया पूर्ण करावी; तसेच दर्जेदार व नियोजनबद्ध पद्धतीने कामे पूर्ण करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.
भूमी अभिलेख, महसूल, पंचायत समिती तसेच तांत्रिक विभागांनी समन्वय साधून शेतकरी व ग्रामस्थांना दिलासा मिळेल अशा पद्धतीने कामे तातडीने पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देशही आमदार धस यांनी दिले. बैठकीस उपविभागीय अधिकारी वसीमा शेख, तहसीलदार वैशाली पाटील, तहसीलदार घोळवे, नायब तहसीलदार जोशी, उपाधीक्षक भूमी अभिलेख मोरे, तालुका कृषी अधिकारी तरटे, महसूल मंडळ अधिकारी, तलाठी, सर्व्हेअर, पंचायत विभागाचे तांत्रिक अधिकारी व सहायक कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.





