जास्तीचे पाणी देऊ शकत नाही

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सिडको वाळूज महानगरात पाणी टंचाई आहे. पाच दिवसांतून एकदा पाणी मिळते. उन्हाळ्यात ही समस्या वाढते. दत्तात्रय वर्पे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. एमआयडीसीने पत्र पाठवून अतिरिक्त पाणी देणे शक्य नसल्याचे सांगितले. जुन्या जलवाहिनीमुळे समस्या आहे. नवीन जलवाहिनीचे काम सुरू झाल्यावर विचार केला जाईल.

जास्तीचे पाणी देऊ शकत नाही

वाळूज महानगर : सिडकोत पाणी टंचाई निर्माण झाल्याने सोमवारी (११ मे) एमआयडीसी कार्यालयासमोर अर्धनग्न उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिला असता एमआयडीसीने आंदोलकाला पत्र पाठवून पाणी देऊ शकत नसल्याचे सांगितले आहे. या पूर्वीही पंचायत समिती सदस्य दत्तात्रय वर्पे यांनी ‘घडा फोडो’ आंदोलन केले होते. त्यानंतर नुकताच नागरिकांना पाणी मिळावे यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. एमआयडीसीने पत्र पाठवून पाणीपुरवठा करू शकत नाही, आंदोलन स्थगित करा, असे सांगितले आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता नितीन जाधव यांनी दिली.

सिडको वाळूजमहानगर परिसरात नागरिकांना पाच दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. येथील सर्व सोसायट्यामध्ये सिडकोच्या पाण्यासह कूपनलिकेच्या पाण्यातून तहान भागवली जाते. मात्र उन्हाळ्यात कूपनलिकेची पाणी कमी पडत असल्याने टंचाईचा सामना करावा लागतो. यासाठी परिसरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, नागरिक यांनी सिडकोच्या विरोधात आंदोलन केली आहेत. मात्र एमआयडीसीकडून कमी पाणी मिळत असल्याने पुरवठा करू शकत नसल्याचे सिडकोच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांना सांगितले आहे. त्यामुळे दत्तात्रय वर्पे यांनी एमआयडीसीकडून सध्या मिळणारे पाच एमएलडी पाणी पुरेसे नाही. किमान बारा एमएलडी मिळावे यासाठी सोमवारी एमआयडीसी कार्यालयासमोर अर्धनग्न उपोषणाचा आंदोलनाचा इशारा दिला होता.

मात्र एमआयडीसी प्रशासनाने त्यांना पत्र पाठवून ‘आम्ही अतिरिक्त पाणी पुरवठा करू शकत नाही त्यामुळे आंदोलन स्थगित करावे,’ असे पत्र पाठवण्यात आले. एमआयडीसीची पाण्याची गरज भागविण्याकरिता पाणीपुरवठा योजना विकसित केली आहे. वाळूजसाठी ७२ एमएलडी क्षमतेची जलवाहिनी टाकली असून, चोवीस तास पाण्याची उपलब्धता असते. यातून एमआयडीसीसह ज्या ग्रामपंचायत क्षेत्रातील जमिनी संपादित केल्या व एमआयडीसीच्या जलवाहिनीलगत आहेत अशा ग्रामपंचायतींना सामाजिक बांधिलकीच्या नात्याने पाणीपुरवठा केला जातो. अतिरिक्त पाणी उपलब्ध असल्यास बजाजनगरसह १५ ग्रामपंचायतींसह नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येतो. या योजनेतून सिडको परिसरात दर दिवशी पाच एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. वाळूज एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी योजना ४० वर्षे जुनी असुन ब्रह्मगव्हाण ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतची १०५० मिमी व्यासाची वाहिनी जीर्ण झाली आहे. ही जलवाहिनी वारंवार फुटून पाणीपुरवठ्यामध्ये खंड पडतो. एमआयडीसीतील उद्योजकांची गरज ४० एमएलडी पाण्याची असून, त्यांना फक्त ३२ एमएलडी पाणीपुरवठा शक्य आहे. एमआयडीसी; तसेच सिडकोकडून अतिरिक्त पाण्याची मागणी होते. जुनी व जीर्ण पाइपलाइन विचारात घेता यातून अतिरिक्त पाणी उपलब्ध करणे शक्य नाही. यासाठी एमआयडीसीने जुनी जलवाहिनी बदलून जास्त क्षमतेची जलवाहिनी टाकण्यासाठीच्या प्रस्तावास नुकतीच मंजुरी प्राप्त झाली आहे. कामासाठी निविदा मागविल्या आहेत. त्यामुळे जलवाहिनी बदलण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सिडको परिसरात अतिरिक्त पाणी देण्यासाठी विचार केला जाऊ शकतो. यामुळे सिडकोला अतिरिक्त पाणीपुरवठा करणे एमआयडीसीला शक्य नाही. सिडकोतील रहिवाशांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी एमआयडीसीची नसल्याने आमच्या कार्यालयासमोर आंदालने करण्यात येऊ नये, असे वर्पे यांना दिलेल्या पत्रात सांगितले आहे.