रामदासपेठ परिसरातील आशिष अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावरील खिडकीच्या सज्जावर बसलेल्या युवकाला अग्निशमन दलाने ग्रीन नेट, सेफ्टी बेल्ट व दोरीच्या साहाय्याने सुखरूप खाली उतरवत सीताबर्डीच्या पोलिसांच्या स्वाधीन केले.
रविवारी सायंकाळी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील सज्जावर हा युवक बसलेला असल्याचे नागरिकांना आढळून आले. युवक काहीसा घाबरलेला असल्याचे नागरिकांना जाणवले. त्यामुळे नागरिकांनी तत्काळ सीताबर्डी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळ गाठत तत्काळ अग्निशमन विभागाला या प्रकाराची माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विभागाला पाचारण करण्यात आले. अखेर अग्निशमन विभागाने ग्रीन नेट, सेफ्टी बेल्ट व दोरीच्या साहाय्याने युवकाला खाली उतरवले. आकाश रवी तिवारी (वय २५) असे युवकाचे नाव असून तो वाडी येथील रहिवासी आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, युवक काहीसा तणावात असल्याचे जाणवत होते. आकाशला सुरक्षितपणे खाली उतरवल्यानंतर त्याला सीताबर्डी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.





