महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या मार्च २०२६ दहावी परीक्षेचा निकाल आठ मे रोजी जाहीर झाला असून, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये; म्हणून पुरवणी परीक्षा येत्या जून-जुलैमध्ये होणार आहे. या परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार गटातून अर्ज करणाऱ्या; तसेच आयटीआय (ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट) घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.
विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या वेबसाइटवरून अर्ज भरावेत. नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत आज, १२ ते २१ मे, तर विलंब शुल्कासह २२ ते २५ मे अशी आहे. शाळांनी शुल्क आरटीजीएस/एनइएफटीद्वारे २६ मेपर्यंत भरायचे असून, प्रिलिस्ट व कागदपत्रे २९ मेपर्यंत मंडळाकडे जमा करायची आहेत. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर प्रीलिस्टची छाननी करून विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेणे बंधनकारक आहे; तसेच मुख्याध्यापकांनी प्रत्येक पानावर शिक्का व स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. अर्जातील माहिती अचूक असल्याची खात्री करणे शाळांची जबाबदारी असेल.
जुन्या चलनांचा वापर नको
परीक्षा शुल्क भरल्याशिवाय प्रवेशपत्र उपलब्ध होणार नाही. जुन्या बँक चलनांचा वापर करता येणार नाही; तसेच रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही. नियमित व विलंब शुल्काच्या मुदतीनंतर मुदतवाढ दिली जाणार नाही, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिली.






