‘इक्विटी’तील गुंतवणूक पाच टक्क्यांनी घटली

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मध्यपूर्वेतील तणाव आणि जागतिक चिंतेमुळे इक्विटी म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक एप्रिलमध्ये ५ टक्क्यांनी कमी झाली. एसआयपी गुंतवणुकीतही घट झाली. मात्र, डेट फंडांतील वाढीमुळे एकूण मालमत्ता वाढली. बाजारातील नफ्यामुळे ही वाढ शक्य झाली. फेब्रुवारीच्या तुलनेत एप्रिलमधील गुंतवणूक अधिक आहे.

5 drop in equity investments amid global tensions

मध्यपूर्वेतील भू-राजकीय तणाव , कच्च्या तेलाचा सतत बदलणारा दर आणि जागतिक विकासाबाबतची चिंता या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक मार्चच्या तुलनेत ५ टक्क्यांनी आटली असून ती ३८,४४० कोटी रुपये झाली आहे. ही माहिती म्युच्युअल फंडांची मध्यवर्ती संघटना असलेल्या ॲम्फीने दिली आहे.

दरमहिना केली जाणारी गुंतवणूक, अर्थात एसआयपीमध्येही घसरण पाहायला मिळाली आहे. मार्चमध्ये एसआयपीद्वारे ३२,०८७ कोटी रुपये म्युच्युअल फंडांत आले होते. एप्रिलमध्ये ३१,११५ कोटी रुपये एसआयपींचे योगदान झाले आहे.

मार्च महिन्यात म्युच्युअल फंडांतून २,४०,००० कोटी रुपये काढले गेले. मात्र एप्रिलमध्ये फंडांतील गुंतवणूक ३,२२,००० कोटींनी वाढली. यामध्ये डेट फंडांत गुंतवणूकदारांनी २,५०,००० कोटी रुपयांचा मोठा वाटा आहे. या ओघामुळे उद्योगाची व्यवस्थापनांतर्गत मत्ता मार्चअखेरच्या ७३ लाख ७३ हजार कोटी रुपयांवरून एप्रिलअखेर ११ टक्क्यांनी वाढून ८१ लाख ९२ हजार कोटी रुपयांवर पोहोचली.

अॅम्फीचे सीईओ व्यंकट चालसानी म्हणाले की, विविध विभागांमधील सकारात्मक प्रवाह आणि महिन्याभरात बाजारात झालेल्या नफ्यामुळे हे शक्य झाले. आकडेवारीनुसार, इक्विटीमधील गुंतवणुकीचा ओघ मार्चमधील ४०,४५० कोटींवरून एप्रिलमध्ये ३८,४४० कोटी रुपयांवर घसरला. मात्र, फेब्रुवारीमध्ये नोंदवलेल्या २५,९७८ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीपेक्षा एप्रिलमधील गुंतवणूक अधिक ठरली आहे.