रुपयाचा वापर वाढता

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

रिझर्व्ह बँकेने रुपयाच्या आंतरराष्ट्रीयीकरणावर भर दिला आहे. आयात-निर्यातीत रुपयाचा वापर वाढला आहे. सीबीडीसीचा वापर सीमापार व्यवहारांसाठी प्रायोगिक तत्त्वावर होणार आहे. सिंगापूर आणि यूएईसोबत चर्चा सुरू आहे. मात्र, बनावट नोटांचे प्रमाण वाढले असून ५०० रुपयांच्या बनावट नोटा सर्वाधिक आढळल्या आहेत.

रुपयाचा वापर वाढता

गेल्या काही वर्षांत आयात-निर्यातीच्या व्यवहारांसाठी रुपयाचा वापर वाढला आहे. रुपयाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाची ही प्रक्रिया सर्व व्यापारी घटकांसाठी परस्परांना फायदेशीर ठरली आहे, असे निरीक्षण रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) शुक्रवारी नोंदवले. आर्थिक वर्ष २०२५-२६साठीचा वार्षिक अहवाल आरबीआयने प्रसिद्ध केला. त्यामध्ये चालू आर्थिक वर्षासाठीचा भारतीय अर्थव्यवस्थेचा अंदाजही देण्यात आला आहे.

चालू खाते आणि निवडक भांडवली खाते अशा दोन्ही व्यवहारांसाठी रुपयाचा वापर वाढवून आंतरराष्ट्रीय चलन म्हणून त्याची भूमिका मजबूत करण्यासाठी आरबीआयने गेल्या काही वर्षांत अनेक पावले उचलली आहेत. शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या आपल्या वार्षिक अहवालात आरबीआयने म्हटले आहे की, इनव्हॉइसिंग आणि सेटलमेंट (व्यवहारांची पूर्तता) करण्यासाठी चलन म्हणून रुपयाचे स्थान उंचावल्यामुळे विनिमय दराच्या जोखमीपासून संरक्षण मिळण्याची शक्यता आहे. तसेच परिवर्तनीय चलनांमध्ये अमेरिकी डॉलरसारखा महागडा परकीय चलनसाठा बाळगण्याची गरज कमी होईल आणि इतरही फायदे मिळतील.

सीमापार व्यवहारांसाठी प्रायोगिक तत्त्वावर सीबीडीसी

रिझर्व्ह बँक चालू आर्थिक वर्षात सेंट्रल बँक डिजिटल करन्सीचा (सीबीडीसी) वापर प्रायोगिक तत्त्वावर करणार आहे. डिजिटल रुपयाचा विस्तार प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेसाठी आणि देशांतर्गत किरकोळ क्षेत्रात करण्यासोबतच, सीमापार व्यवहारांमध्येही सीबीडीसी वापरण्याचा आरबीआयचा मानस आहे. सीमापार पेमेंटच्या संदर्भात, आरबीआयने २०२५-२६ मध्ये सिंगापूरच्या मुद्रा प्राधिकरणासोबत (एमएएस) डिजिटल मालमत्ता सहकार्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. तसेच, सीमापार सीबीडीसी प्रायोगिक प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी एमएएस आणि यूएईच्या मध्यवर्ती बँकेसोबत द्विपक्षीय चर्चा झाली आहे. ‘सीबीडीसी आणि अॅसेट टोकनायझेशन’विषयक प्रकल्पांतर्गत सीबीडीसीचा वापर करून नाविन्यपूर्ण उत्पादने/सेवांच्या चाचणीसाठी नियमावली करणे हे देखील चालू आर्थिक वर्षात आरबीआयच्या कार्यसूचीमध्ये समाविष्ट आहे.

बनावट नोटा वाढल्या

बँकिंग व्यवस्थेत बनावट नोटा आढळण्याचे प्रमाण २०२५-२६ मध्ये ५.७ टक्क्यांनी वाढले आहे. यात ५०० आणि २०० रुपयांच्या मूल्यांच्या बनावट नोटा मोठ्या प्रमाणावर सापडल्याचे आरबीआयने आपल्या वार्षिक अहवालात म्हटले आहे. पकडल्या गेलेल्या बनावट नोटांची एकूण संख्या २०२५-२६ मध्ये वाढून २,२९,७४६ झाली आहे. ५०० रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण सर्वाधिक राहिले असून, २०२४-२५ मधील १,१७,७२२ नोटांच्या तुलनेत या वर्षात २०.५ टक्क्यांनी वाढ होऊन ही संख्या १,४१,९०७ वर पोहोचली आहे. २० रुपयांच्या बनावट नोटांच्या संख्येत सर्वात मोठी वाढ नोंदवली गेली आहे.