सरासरीपेक्षा कमी मान्सूनचा पावसाचा अंदाज आणि अमेरिका-इराण युद्धविरामाची अनिश्चितता यामुळे शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स १,०९२ अंकांनी कोसळला, तर एनएसी निफ्टी २४,५५० च्या खाली बंद झाला. शेवटच्या क्षणी झालेल्या प्रचंड भागविक्रीमुळे, ३० शेअर्स असलेला बीएसई सेन्सेक्स १,०९२.०६ अंकांनी कोसळून ७४,७७५.७४वर बंद झाला. दिवसभरात तो १,२७८.६९ अंकांनी घसरून ७४,५८९.११वर आला होता.
सलग तिसऱ्या सत्रात घसरण नोंदवताना, एनएसई निफ्टी ३५९.४० अंकांनी घसरून २३,५४७.७५वर बंद झाला.
सेन्सेक्समधील ३० कंपन्यांपैकी पॉवर ग्रिड, इंटरग्लोब एव्हिएशन (इंडिगो), एनटीपीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा स्टील आणि बजाज फायनान्स या कंपन्यांचे समभाग सर्वाधिक घसरले. दुसरीकडे, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, लार्सन अँड टुब्रो आणि इन्फोसिस या कंपन्यांचे समभाग वाढीसह बंद झाले. जागतिक तेल बाजारात ब्रेन्ट क्रूडचा वायदा दर प्रतिबॅरल १.५२ टक्क्यांनी घसरून ९२.२९ डॉलरवर गेला.
जागतिक बाजार
आशियाई बाजारपेठांमध्ये दक्षिण कोरियाचा बेंचमार्क कोस्पी, जपानचा निक्केई २२५ आणि हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक वधारून बंद झाले, तर शांघायचा एसएसई कंपोझिट निर्देशांक घसरणीसह बंद झाला. युरोपमधील बाजार सकारात्मक पातळीवर व्यवहार करत होते. गुरुवारी अमेरिकन बाजार तेजीसह बंद झाले होते. शेअर बाजारांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बुधवारी १,०४२.७० कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.
ईद-उल-अजहानिमित्त गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजार बंद होते. यापूर्वी बुधवारी, सेन्सेक्स १४१.९० अंकांनी किंवा ०.१९ टक्क्यांनी घसरून ७५,८६७.८० वर बंद झाला होता, तर निफ्टी ६.५५ अंकांनी किंवा ०.०३ टक्क्यांनी घसरून २३,९०७.१५ वर आला होता.








