गतिक तंत्रज्ञान क्षेत्रावर असलेल्या अमेरिकेच्या मक्तेदारीला यशस्वीरीत्या सुरुंग लावला तो चीनचा तरुण उद्योजक झांग यिमिंग याने. जगप्रसिद्ध ‘ टिकटॉक ’ ॲपद्वारे झांगने दाखवून दिले, की केवळ सिलिकॉन व्हॅलीच नव्हे; तर एखादी आशियाई कंपनीसुद्धा आपल्या तंत्रज्ञानाच्या जोरावर जागतिक पातळीवर क्रांती घडवू शकते. झांगचे हे यश चीनच्या तंत्रज्ञान क्रांतीचे प्रतीक समजले जाते.
बाइटडान्स या जगातील एका अग्रणी स्टार्टअपचा संस्थापक असलेल्या ४२-वर्षीय झांग यिमिंग याचा जन्म १ एप्रिल १९८३ रोजी चीनच्या फुजियान प्रांतातील लाँगयान शहरात झाला. लहानपणापासूनच त्याला तंत्रज्ञान, व्यवसाय आणि नवनवीन शोध यामध्ये रस होता. त्याने चीनमधील नामांकित नानकाई विद्यापीठातून सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. पदवी पूर्ण केल्यानंतर झांगने प्रथम कुक्सुन या पर्यटन शोध वेबसाइटवर इंजिनियर म्हणून काम केले. नंतर त्याने मायक्रोसॉफ्टमध्ये थोडे दिवस काम केले. २००९मध्ये त्याने आपला पहिला स्टार्टअप ‘९९फँग डॉट कॉम’ सुरू केला. हा एक रिअल इस्टेट शोध प्लॅटफॉर्म होता, जो बऱ्यापैकी यशस्वी ठरला.
एव्हाना झांगच्या लक्षात आले की, लोक आता डेस्कटॉपवरून स्मार्टफोनकडे वेगाने वळत आहेत. परंतु, स्मार्टफोनवर लोकांना त्यांच्या आवडीनुसार अचूक माहिती देणारे कोणतेही माध्यम उपलब्ध नव्हते. याच विचारातून त्याने २०१२मध्ये ‘बाइटडान्स’ची स्थापना केली. युजर्सना शोधाशोध न करावी लागता त्यांच्या आवडीनुसार माहिती स्वतःहून त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. त्यासाठी त्याने पारंपरिक न्यूज फीडऐवजी अल्गोरिदम-आधारित फीड वापरण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. बाइटडान्सने २०१२मध्ये ‘तौतियाओ’ नावाचे न्यूज ॲग्रीगेटर ॲप सुरू केले. हे ॲप युजर्सच्या वाचनाच्या सवयी, त्यांना आवडणारे विषय आणि ते कोणत्या पोस्टवर किती वेळ थांबतात, याचा अभ्यास करून त्यांना बातम्या आणि लेख दाखवायचे. हे ॲप चीनमध्ये प्रचंड गाजले आणि अवघ्या काही वर्षांत कोट्यवधी लोक याचा वापर करू लागले. २०१६मध्ये त्याने चीनमध्ये ‘डौयिन’ नावाचे ॲप सुरू केले.
डौयिनची लोकप्रियता पाहून झांगने त्याचे जागतिक व्हर्जन म्हणजेच टिकटॉक आंतरराष्ट्रीय बाजारात आणले. टिकटॉकला अमेरिकेत आणि जगभरात पाय रोवण्यासाठी झांगने २०१७मध्ये ‘म्युझिकली’ हे अमेरिकेतील लोकप्रिय व्हिडिओ ॲप जवळपास एक अब्ज डॉलरना विकत घेतले आणि ते टिकटॉकमध्ये विलीन केले.
टिकटॉकने अल्पावधीतच सोशल मीडिया विश्वाला जबरदस्त भुरळ घातली. तरुणांनी तर हे ॲप अक्षरशः डोक्यावर घेतले. ‘जेन-झी’चे ते सर्वाधिक पसंतीचे अ ॅप आहे. त्याचा अल्गोरिदम इतका अचूक आणि प्रभावी होता की संगीत, नृत्य, विनोद, शिक्षण, माहिती आणि मनोरंजन अशा अनेक गोष्टींचे व्हिडीओ टिकटॉकवर लोक पाहू लागले. फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब सारख्या दिग्गजांनाही टिकटॉकने घाम फोडला.
आज टिकटॉक हे जगभरातील सर्वात जास्त डाउनलोड होणाऱ्या अ ॅपपैकी एक आहे आणि त्याचे एक अब्जाहून अधिक मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत. आज बाइटडान्सची किंमत ७०० अब्ज डॉलरपेक्षा जास्त झाली आहे तर झांगची संपत्ती ६५ अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे, ज्यामुळे तो चीनमधील सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरला आहे. मात्र कोणत्याही मोठ्या यशासोबत मोठी आव्हाने येतातच. अमेरिका, भारत आणि इतर देशांत टिकटॉकवर सुरक्षा आणि डेटा गोपनीयतेच्या मुद्द्यांवर बंदी किंवा निर्बंध आले. भारत ही टिकटॉकसाठी सर्वात मोठी बाजारपेठ होती, त्यामुळे हा बाइटडान्ससाठी मोठा धक्का होता.
झांगने २०२१मध्ये बाइटडान्सच्या सीईओपदाचा राजीनामा दिला. मात्र पद सोडल्यानंतरही तो कंपनीचा मुख्य भागधारक आणि मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहे.








