अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे दिला जाणारा वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्कार लेखक, दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांना, तर प्रा. वसत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना जाहीर झाला. नाशिकचे रंगकर्मी सुनील देशपांडे यांना बाबूराव सावंत नाट्यकर्मी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
रंगभूमीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मींना दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या विविध पुरस्कारांची अधिकृत घोषणा शुक्रवारी (दि. २९) करण्यात आली. नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम आणि प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हा पुरस्कार वितरण सोहळा जूनच्या शेवटच्या आठवड्यात नाशिक येथे आयोजित करण्यात येणार आहे. सोहळ्याला ज्येष्ठ चित्रपट व नाट्य दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
नाशिक शाखेच्या वतीने गेल्या १९९८ पासून ‘वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्कार’ व ‘प्रा. वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार’ प्रदान करण्यात येतात. २००५ पासून हे पुरस्कार द्विवार्षिक करण्यात आले आहेत. या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप ३१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे आहे. तसेच, २०१४ पासून सुरू झालेल्या ‘बाबूराव सावंत नाट्यकर्मी पुरस्काराचे’ स्वरूप १५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे आहे. प्रा. रवींद्र कदम, सुनील ढगे, राजेश भुसारे, विजय शिंगुणे, राजेश जाधव आणि महेश डोकफोडे यांच्या निवड समितीने या पुरस्कारार्थींची निवड केली.
सर्वोत्तम रंगसंघ पुरस्कार २०२५
प्रथम : विजय नाट्य मंडळ, नाशिक (नाटक : काळाच्या पंजातून)
द्वितीय : परिवर्तन बहुउद्देशीय संस्था, नाशिक (नाटक : कूच कूच)
- रंग दिग्दर्शक पुरस्कार २०२५: वरुण भोईर (नाटक : काळाच्या पंजातून)
रंगनायक पुरस्कार २०२५: अमोल थोरात (नाटक: काळाच्या पंजातून)
रंगनायिका पुरस्कार २०२५: मानसी मारू (नेबर, प्लम्बर आणि ती)
तरुण रंगकर्मींना प्रोत्साहन देण्यासाठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेने यंदा पाच नवीन पुरस्कारांची घोषणा केली असून, सन २०२५ च्या राज्य नाट्य स्पर्धेतील कामगिरीच्या निकषांवर पहिल्या पुरस्कारांचे मानकरीही जाहीर केले आहेत. सर्वोत्तम रंगसंघ प्रथम पुरस्कारासाठी १५ हजार, द्वितीय दहा हजार रुपये रोख तर इतर तीन पुरस्कारांसाठी पाच हजार रुपये रोख, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार दरवर्षी रंगभूमी दिनी (दि. ५ नोव्हेंबर) महाकवी कालिदास कलामंदिर येथे प्रदान केले जातील.








