कन्नड : मार्च २०२६मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानभरपाईपोटी निधी वितरित करण्याचा शासन निर्णय १८ मे २०२६ रोजी घेण्यात आला आहे. यामध्ये कन्नड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही तालुक्याचा समावेश नसल्याचे दिसून आले. अपेक्षित निधी दोन कोटी १६ लाख ५५ उपलब्ब झाला नसल्यामुळे सरकारने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे दिसून आले आहे.
कन्नड तालुक्यात मार्च २०२६मध्ये तीन हजार २७५ शेतकऱ्यांचे एक हजार५४१.९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये जिरायत ५४३.५० हेक्टर, बागायत ९८३.५९ हेक्टर व फळबागांचे १४ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. यासाठी अपेक्षित निधी दोन कोटी १६ लाख ५५ हजार आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा व कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे.









