बीडमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ताकद देणार

महाराष्ट्र टाइम्स

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बीड जिल्ह्यात शिवसंवाद दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांना संबोधित केले. मराठवाडा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, तो टिकवण्यासाठी पक्ष प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देईल. आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले. केज आणि परळीमध्ये लवकरच तालुकाप्रमुख व शाखाप्रमुखांच्या नियुक्त्या होतील. पक्ष सामान्य कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवून आहे, कामाला महत्त्व दिले जाईल.

बीडमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ताकद देणार
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

दहा दिवसांपूर्वी मुलाचे निधन झाल्याने रसूल गफूर सय्यद हे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना निवेदन देण्यासाठी केज येथे आले होते. या वेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता तिथे त्यांचे निधन झाले. या घटनेची माहिती मिळताच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सय्यद यांच्या घरी भेट दिली आणि त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. या भेटीदरम्यान खासदार डॉ. शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत केली. सय्यद यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी शिवसेना घेईल, असे आश्वासन खासदार शिंदे यांनी या वेळी दिले.

‘ मराठवाडा शिवसेनेचा बालेकिल्ला कायम ठेवण्यासाठी इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याला पक्ष ताकद देईल,’ असे आश्वासन शिवसेना संसदीय पक्षाचे नेते, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना दिले. शिवसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने खासदार डॉ. शिंदे यांनी बीड जिल्ह्यात तीन बैठका घेतल्या.

पहिल्या बैठकीत केज आणि परळी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. पाटोदा येथे झालेल्या दुसऱ्या बैठकीत बीड आणि माजलगाव आणि तिसऱ्या बैठकीत आष्टी आणि गेवराई विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी मंत्री भरत गोगावले. खासदार संदिपान भुमरे, माजी खासदार आनंद परांजपे, माजी आमदार संगीता ठोंबरे, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

खासदार डॉ. शिंदे म्हणाले, की मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. बीड जिल्ह्यात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी पक्षनेतृत्वाने प्राधान्य दिले आहे.

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी जोमाने काम करा. पक्ष कार्यकर्त्याला ताकद देण्याचे काम करील. ‘परळी, केजमधील तालुकाप्रमुख, उप तालुकाप्रमुख, शाखाप्रमुख, उप शाखाप्रमुखांच्या लवकरच नियुक्त्या केल्या जातील, असे ते म्हणाले. पक्षनेतृत्वाचे सामान्य कार्यकर्त्यावर लक्ष आहे. जो काम करील त्यालाच पद मिळेल,’ असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.