‘एआय’ नावाचे भीषण वास्तव

Contributed byडॉ. भक्ती वारे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

एआयचा वाढता वापर आता एका व्यसनासारखा बनत चालला आहे. लोक आपल्या समस्यांसाठी डॉक्टरांऐवजी एआयचा आधार घेत आहेत. यामुळे नातेसंबंध बिघडत असून आत्मविश्वास कमी होत आहे. एआयमुळे नैसर्गिक निर्णय क्षमता कमी होत असून भावनांक घटत आहे. माणसाला माणसाची गरज आहे, एआयची नाही. यावर विचार करण्याची वेळ आली आहे.

‘एआय’ नावाचे भीषण वास्तव

ही दिवसांपूर्वी एक तरुण जोडपे माझ्याकडे समुपदेशनासाठी आले. त्यांची समस्या ऐकल्यानंतर मलाच मोठा मानसिक धक्का बसला. काही कारणामुळे त्यांना त्यांचे बाळ गमवावे लागले. या घटनेचा दोघांवरही खोल परिणाम झाला होता; पण त्या दु:खातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी चक्क आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ‘एआय’चा आधार घेतला. त्यांच्याशी बोलताना आणखी धक्कादायक माहिती समोर आली. गर्भधारणा झाल्यापासून ते बाळाचा जन्म, जन्मानंतर बाळाची कोणती काळजी घ्यावी, अशा सर्व बाबी या जोडप्याने इंटरनेटवरून माहिती घेऊन केल्या होत्या. त्यात परस्परांशी संवाद अतिशय कमी होता. बाळ गेल्याच्या दु:खामुळे बसलेल्या धक्क्यामुळे (ट्रॉमा) दोघेही आणखी कोषात गेले. त्यामुळे परस्परसंवाद आणखीनच खुंटला आणि दर वेळी आपला त्रास कमी करण्यासाठी ‘एआय’चा आधार घेतला जाऊ लागला. त्यातून समस्या सुटण्याऐवजी आणखी चिघळत गेली. जोडप्याचा एकमेकांतील बंधच जीर्ण झाला.

दुसऱ्या एका प्रकरणात संबंधित रुग्णाने प्रत्येक वेळी डॉक्टरांची फी द्यायला लागू नये यासाठी डॉक्टरांना न सांगताच मधुमेहाची औषधे परस्पर बंद केली आणि ‘एआय’ला विचारून दुसरेच उपचार सुरू केले. परिणामी, त्याची दृष्टी जायची वेळ आली. आणखी एका व्यक्तीला आपल्या लैंगिक समस्या आणि आयुष्याबद्दल ‘एआय’शी बोलण्याची सवय लागली होती. आजूबाजूला घडलेल्या या गोष्टी अत्यंत भयानक संकटाची चाहूल देणाऱ्या आहेत.

वैयक्तिक आयुष्यात प्रत्येकाला काही ना काही समस्या असतात. त्या कुटुंबीयांशी, जोडीदाराशी, मित्र-मैत्रिणींशी सल्लामसलत करून सोडवता येतात. मात्र, संवादाची दारे बंद करून त्याऐवजी ‘एआय’सारख्या बेभरवशी आणि कृत्रिम मॉडेलशी चर्चा करणे, आपल्या समस्यांची चर्चा इंटरनेटवर करणे हे केवळ चुकीचे आणि घातक नाही तर ते सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे आहे. ‘ओपीडी’ मध्ये आता रुग्णांना विचारावे लागते, की तुम्ही तुमचे मन कुणाकडे मोकळे करता? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे तुम्ही कुणाला विचारता? डॉक्टरकडे येताना तुम्ही एखादे औषध ‘गुगल’ला विचारून घेतले आहे का? अनेकदा या प्रश्नांचे उत्तर ‘एआय’ असे मिळते. दिनचर्या ठरवण्यापासून ते शारीरिक आजार, भावनिक आणि वैयक्तिक मार्गदर्शनासाठी त्याचा वापर केला जातो आहे. मन मोकळे करण्यासाठीही माणसांपेक्षा ‘इंटेलिजंट असिस्टंट’वर विश्वास ठेवला जाणे ही धोक्याची घंटा आहे. या साऱ्यामागे तत्काळ मिळणारा सल्ला आणि तोही कोणी तरी आपल्या बाजूने चोवीस तास उपलब्ध आहे, अशी भावना उत्पन्न होणे अत्यंत घातक आहे.

जगातील व्यसनांच्या बाजारात आणखी एका व्यसनाची पडलेली भर म्हणजे ‘एआय’चा अविवेकी वापर. कारण, आता हे मनुष्याने तयार केलेले कृत्रिम साधन मनुष्याचेच भविष्य ठरवू लागले आहे. ‘एआय’चा अतिवापर आता आजारामध्ये परिवर्तित होत आहे. अशा वेळी आपण सजग राहिले पाहिजे. प्रियकराला किंवा प्रेयसीला आनंदी कसे करावे यापासून ते अगदी नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी? इथपर्यंतच्या गोष्टी ‘एआय’ला विचारल्या जातात आणि तेथून मिळालेल्या सल्ल्यानुसार वागायचा निर्णय घेतला जातो. कालांतराने त्याचे परिणाम आत्मविश्वास कमी होणे, नैराश्य, निद्रानाश आणि एकटेपणा अशा रूपात दिसतात. आई-वडिलांच्या ‘एआय’ वापराचे अनुकरण करून चिमुकल्याने आपल्या मनातल्या भावना ‘एआय’ला सांगाव्यात आणि घरच्यांपासून काही गोष्टी लपवायला सुरुवात करावी अशी कौटुंबिक स्वास्थ्याला मारक उदाहरणे दिसत आहेत. एकमेकांच्या आयुष्याबद्दल भरभरून बोलणे कमी होताना दिसते, कारण कुटुंबामधील संवाद ‘एआय’मुळे कमी झाला आहे. समुपदेशन करताना त्यांच्यातील दुराव्याचे प्रमुख कारण ‘जोडीदारापेक्षा मला हे टूल जास्त समजून घेते,’ असे सांगितले जातेे.

‘डिजिटल फूटप्रिंट’ नामक पाऊलखुणा आपण सगळे सोशल मीडियामध्ये सोडत असताना ‘इंटेलिजंट असिस्टंट’ सिरी, ॲमेझॉन इको यासारखी कृत्रिम साधने आता आपल्याला आपल्यापेक्षा जास्त ओळखू लागलेली आहेत. या कृत्रिम साधनांनी सल्ले देण्यापुरते मर्यादित न राहता आयुष्याला दिशा देण्याचे घातक कामही सुरू केले आहे. ‘एआय’मुळे सकारात्मक क्रांतिकारी बदल नक्की होत आहेत; पण नैसर्गिकपणे निर्णय घेण्याची क्षमता मात्र कमी होत आहे. बुद्ध्यांक वाढत असला तरी भावनांक कमी होत आहे. हे ‘इंटेलिजंट एजंट’ नक्की कसे सल्ले देतात हे समजून घेणे आवश्यक आहे. या सगळ्यामागे एक अल्गोरिदम तयार होत असतो आणि हे सारे ‘डेटा सायंटिस्ट’ किंवा तज्ज्ञ ठरवतात. यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळी ‘रिअलिटी’ जन्माला येत आहे. तिचे परिणाम सकारात्मकच असतील असे नाही. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. तिच्या आयुष्यातील अनुभव वेगळे असतात आणि प्रत्येकाची वेगवेगळ्या प्रसंगांकडे पाहण्याची दृष्टी वेगळी असते, याचा विचार ‘एआय’ करीत नाही. अडचणीच्या, दु:खाच्या वेळी आपण आत्मपरीक्षणाऐवजी अशा साधनांचा वापर करून आपण एका भ्रमामध्ये स्वतःला न कळत अडकवून घेत असतो. याचा डोळसपणे विचार करणे आवश्यक आहे.

‘एआय’ महाभारतातील मयसभेसारखे आहे. मनुष्याने वेगाची संकल्पना मांडली, पण त्यामध्ये आपणच अडकून जगणे थांबवले. नकळत आपल्याच चाणाक्ष बुद्धीमध्ये आपणच बंदिस्त होत आहोत. आजूबाजूला पाहिल्यास विचार करण्याचे प्रमाण जास्त आहे; पण भावनांक वाढवून प्रत्यक्ष गोष्टी अनुभवण्याचे प्रमाण कमी आहे . नैसर्गिकपणे बुद्ध्यांक, भावनांक आणि मूलभूत नैसर्गिक क्षमतांचा विकास या सहज-शाश्वत गोष्टी मागे पडताना दिसतात आणि त्याचा विपरित परिणाम वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्यावर होत आहे. एकटेपणा आणि एकांत यांतील फरक समजून घेण्याची वेळ आलेली आहे.

भावनांक विकसनाची पहिली पायरी म्हणजे आपण ज्या समस्येमधून आता जात आहोत त्याची जाणीव होणे. माणसाला माणसाशिवाय पर्याय नाही. एकमेकांशी मोकळेपणाने संवाद आणि भावनेने जुळलेले बंध कधी कधी बौद्धिक उत्तरे देऊ शकणार नाहीत, पण सोबत आणि आधार नक्की देऊ शकतील.

(लेखिका होमिओपॅथी डॉक्टर आणि समुपदेशक आहेत.)