श्चिम आशियातील युद्ध आणि ‘होर्मुझ’ची सामुद्रधुनी बंद होण्याच्या पार्श्वभूमीवर, चालू महिन्यात व्हेनेझुएला भारताचा कच्च्या तेलाचा तिसरा सर्वांत मोठा पुरवठादार देश ठरला. हा देश जगातील सर्वांत मोठा प्रमाणित तेलसाठा असलेला देश म्हणून ओळखला जातो. चालू वर्षाच्या सुरुवातीला निकोलस मादुरो यांना सत्तेवरून हटवल्यानंतर अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या कच्च्या तेलाच्या निर्यातीवरील निर्बंध अंशतः उठवल्यानंतर ही घडामोड समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज चालू आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे ही घडामोड महत्त्वाची ठरते.
‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार, मे २०२६मध्ये व्हेनेझुएला भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा करणारा तिसरा सर्वांत मोठा देश ठरला. भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा करण्याच्या बाबतीत व्हेनेझुएला आता केवळ रशिया आणि संयुक्त अरब अमिरातीच्या मागे आहे. व्हेनेझुएलाने या बाबतीत सौदी अरेबिया आणि अमेरिकेला मागे टाकले आहे. मे महिन्यात भारताची एकूण कच्च्या तेलाची आयात प्रतिदिन सुमारे ४९ लाख बॅरल होती. व्हेनेझुएलाने मे महिन्यात आतापर्यंत भारताला प्रतिदिन सुमारे ४,१७,००० बॅरल तेल पाठवले आहे. ही संख्या एप्रिलमधील २,८३,००० बॅरल प्रतिदिनच्या तुलनेत ४७.३ टक्क्यांनी अधिक आहे. मार्च महिन्यात भारताने व्हेनेझुएलाकडून प्रतिदिन सुमारे ३,४३,००० बॅरल कच्च्या तेलाची आयात केली होती.
एका इंग्रजी दैनिकाने ‘केपलर’च्या हवाल्याने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारताने मे महिन्यात व्हेनेझुएलाकडून १ ते १.२ कोटी बॅरल तेल आयात करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, गेल्या नऊ महिन्यांत भारताने व्हेनेझुएलाकडून आजिबातच तेलाची आयात केली नव्हती. ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार, अनेक भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांनी; विशेषतः रिलायन्स इंडस्ट्रीजने व्हेनेझुएलाकडून खरेदी वाढवली आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे व्हेनेझुएलाच्या कच्च्या तेलाच्या किमती रशियन तेलासह इतर प्रतिस्पर्धी देशांच्या तेलाच्या तुलनेत स्वस्त आहेत. मे महिन्यात सौदी अरेबियाकडून भारताला होणारा तेलाचा पुरवठा जवळपास निम्म्याने घसरून प्रतिदिन ३,४०,००० बॅरलवर आला; तो एप्रिलमध्ये प्रतिदिन ६,७०,००० बॅरल होता. यासाठी विश्लेषकांनी यासाठी सौदी उत्पादकांच्या आक्रमक किंमत धोरणाला जबाबदार धरले आहे.
एका इंग्रजी वेबसाइटनुसार, ‘नायरा एनर्जी’, ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’ आणि ‘एचपीसीएल-मित्तल एनर्जी लिमिटेड’ या कंपन्यांचे तेल शुद्धिकरण प्रकल्प व्हेनेझुएलाच्या ‘मेरे ब्लेंड’ नामक तेलावर प्रक्रिया करू शकतात. हे कच्चे तेल अधिक जड मानले जाते. गेल्या वर्षाच्या तुलनेत हा एक अत्यंत मोठा बदल आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते डिसेंबर २०२४ दरम्यान देशाच्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातखर्चामध्ये व्हेनेझुएलाचा वाटा केवळ एक टक्का होता. ही रक्कम एक अब्ज डॉलर होती. सन २०२४ मध्ये भारताने व्हेनेझुएलाकडून अवघ्या २.२ कोटी बॅरल कच्च्या तेलाची आयात केली; जी त्या वर्षातील भारताच्या एकूण कच्चे तेल आयातीच्या सुमारे १.५ टक्के होती. सन २०१५च्या आसपास), भारताच्या तेल आयातीमध्ये व्हेनेझुएलाचा वाटा सुमारे १२ टक्के होता. २०१३ मध्ये दोन्ही देशांमधील व्यापार १३ अब्ज डॉलरवर पोहोचला होता; जो भारताच्या एकूण कच्चे तेल आयातीच्या सुमारे १० टक्के होता. सन २०१९मध्ये व्हेनेझुएला हा भारताला तेल पुरवणारा पाचवा सर्वांत मोठा देश होता. व्हेनेझुएलाने भारताला सुमारे १.६ कोटी टन म्हणजेच साधारण ११.७ कोटी बॅरल कच्चे तेल पाठवले होते. दोन्ही देशांमधील ६.४० अब्ज डॉलरच्या द्विपक्षीय व्यापारापैकी बहुतांश हिस्सा म्हणजेच ६.०६ अब्ज डॉलरचा व्यापार एकट्या कच्च्या तेलाचा होता. मात्र, सन २०२०पर्यंत हा तेल व्यापार घसरून अवघ्या ०.६४ अब्ज डॉलरच्याही खाली आला होता.
अमेरिकेचे निर्बंध कारणीभूत
अमेरिकेच्या निर्बंधांमुळे जागतिक बाजारपेठेत व्हेनेझुएलाचे कच्चे तेल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध न झाल्याने भारताची खरेदी घटली. पेमेंटमधील अडचणी (पैसे भरण्यातील समस्या) आणि बाजारपेठेतील गणिते यामुळेही भारतासाठीची ही समीकरणे पूर्णपणे बदलली. सरकारी तेल कंपनी ‘पीडीव्हीएसए’च्या कागदपत्रांनुसार, अमेरिका, भारत आणि युरोपला झालेल्या वाढीव विक्रीमुळे एप्रिल महिन्यात व्हेनेझुएलाची तेल निर्यात १४ टक्क्यांनी वाढून प्रतिदिन १२.३ लाख बॅरलवर पोहोचली. ही गेल्या सात वर्षांतील सर्वोच्च पातळी आहे. गेल्या महिन्यात व्हेनेझुएलाच्या तेलाचे मुख्य उद्दिष्ट अमेरिका होते; तिथे प्रतिदिन सुमारे ४,४५,००० बॅरल निर्यात करण्यात आली. याच काळात युरोपला होणारा पुरवठा प्रतिदिन १,४४ हजार बॅरलवरून वाढून सुमारे १,६५,००० बॅरल प्रतिदिन झाला.
विविध स्त्रोतांवर भर
भारताने मागील काही वर्षांत कच्च्या तेलाच्या स्त्रोतांमध्ये विविधता आणली असून, पश्चिम आशियातील पारंपरिक पुरवठादारांच्या पलीकडे पाहण्यास सुरुवात केली आहे. सध्या भारत ४१ देशांमधून कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू आयात करतो. तथापि, पश्चिम आशियातील भू-राजकीय संकट पाहता गेल्या काही महिन्यांत हे काम आणखी तातडीचे बनले आहे. भारत हा जगातील सर्वांत मोठ्या तेल ग्राहकांपैकी एक आहे. आकडेवारीनुसार, भारताला देशांतर्गत गरजा पूर्ण करण्यासाठी दररोज सुमारे ५० लाख बॅरल तेलाची आवश्यकता असते. भारत आपल्या गरजेच्या सुमारे ९० टक्के कच्चे तेल आयात करतो. भारताची सुमारे ४० टक्के आयात ‘होर्मुझ’च्या सामुद्रधुनीतून होते. मे महिन्यात भारताची एकूण कच्च्या तेलाची आयात प्रतिदिन सुमारे ४९ लाख बॅरल होती. एप्रिलच्या तुलनेत ती आठ टक्क्यांनी जास्त आहे. एका वृत्तानुसार, भारताकडे सध्या धोरणात्मक साठ्यासह साधारण ६० दिवस पुरेल एवढेच तेल शिल्लक आहे.
रशियावर अवलंबित्व वाढणार?
तज्ज्ञांच्या मते, आगामी काही वर्षांत रशियन कच्च्या तेलावरील भारताचे अवलंबित्व वाढण्याची शक्यता आहे. भारतातील केवळ मोजकेच तेल शुद्धिकरण प्रकल्प (रिफायनरी) व्हेनेझुएलाच्या कच्च्या तेलावर प्रक्रिया करू शकतात. याशिवाय, महत्त्वाचे म्हणजे भारताच्या गरजा मोठ्या प्रमाणावर पूर्ण करण्यासाठी व्हेनेझुएलाकडे पुरेशी रिफायनिंग क्षमताही नाही. निर्बंधांमधून सवलत मिळो वा ना मिळो, रशियन कच्चे तेल सध्या तरी भारताच्या आयात धोरणाच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे, असेही तज्ज्ञांना वाटते. सततची संकटे आणि धोक्यांमुळे पश्चिम आशियातून तेलाची आयात करणे पूर्वीसारखे सोपे किंवा सुरक्षित राहिलेले नाही. त्यामुळे रशियन तेलाची मागणी वाढण्याची शक्यता आहे. एका अंदाजानुसार, रशियाने एप्रिलमध्ये भारताला प्रतिदिन सुमारे १६ लाख बॅरल तेलाची निर्यात केली. मे महिन्यात प्रतिदिन सुमारे २० लाख बॅरल तेल रशियाकडून मिळाले.








