‘पंचवटी’वरून माडगूळकर कुटुंबातील वाद चव्हाट्यावर

महाराष्ट्र टाइम्स

कवी ग. दि. माडगूळकर यांचे 'पंचवटी' निवासस्थान वादात सापडले आहे. गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. 'पंचवटी' पाडून जागा विकण्याचा दबाव आणला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यावर सुमित्र यांच्या आई शीतल माडगूळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. घरात दुरुस्तीच्या वेळी मुलाने मदत केली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हा कौटुंबिक वाद आता समाजमाध्यमांवर चर्चेत आहे.

‘पंचवटी’वरून माडगूळकर कुटुंबातील वाद चव्हाट्यावर
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

‘गीतरामायण’ या अजरामर कलाकृतीचा जन्म आणि मराठी साहित्याच्या सुवर्णकाळाचा कृतिशील साक्षीदार ठरलेल्या विख्यात कवी ग. दि. माडगूळकर यांच्या ‘पंचवटी’ बंगल्याभोवती वादाचे मोहोळ उठले आहे. शिवाजीनगर येथील जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावरील गदिमांच्या ‘पंचवटी’ निवासस्थानावरून माडगूळकर कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला आहे. गदिमांच्या नातवाचे आई, काका व नातेवाइकांवरील आरोप आणि त्यानंतर आईने मुलाला दिलेले प्रत्युत्तर असा वाद समाजमाध्यमांवर सोमवारी भडकल्याने गदिमाप्रेमींना धक्का बसला.

गदिमांचे नातू सुमित्र श्रीधर माडगूळकर यांनी समाजमाध्यमाद्वारे कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. पंचवटी निवासस्थान पाडण्यास विरोध केल्याने मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याची तक्रार सुमित्र यांनी खडकी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. दुसरीकडे त्यांच्या आईने या आरोपांना प्रत्युत्तर देणारे पत्र समाजमाध्यमावर प्रसिद्ध केल्याने कुटुंबकलह समोर आला आहे.

‘गदिमा म्हणायचे की जोपर्यंत ‘पंचवटी’ आहे; तोपर्यंत माझे अस्तित्व राहील. त्यानुसार ही वास्तू वाचवण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. ही वास्तू पाडून जागा बिल्डरला विकावी, यासाठी नातेवाइकांकडून माझ्यावर दबाव आणला जात आहे. गदिमांवर पुस्तके लिहिणारे आणि त्यांचा वारसा सांगण्याचा आव आणणारे या कटात सामील आहेत. माझ्या आणि पत्नीच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे,’ असा आरोप सुमित्र यांनी केला आहे.

‘घराला रंग द्यायचा होता किंवा दुरुस्ती करायची होती, तेव्हा तू पैसे दिले नाही. उलट विरोध केला. आपलेही काही कर्तव्य आहे, असे तुला तेव्हा वाटले नाही. पंचवटीचा पुढचा भाग पडायला आला, तेव्हा तुझ्या बाबांनी आणि काकांनीच तो दुरुस्त केला,’ असे प्रत्युत्तर शीतल माडगूळकर यांनी मुलाला दिले आहे.