विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवूनही काँग्रेसकडून अद्याप मुख्यमंत्रिपदाबाबत अनिश्चितता कायम आहे. पक्षश्रेष्ठींनी केरळमधील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली असून, चर्चेसाठी प्रमुख नेत्यांना दिल्लीला बोलावण्यात आले आहे. केरळ काँग्रेसच्या माजी अध्यक्षांना राजधानीत उपस्थित राहण्यास सांगण्यात आल्याचे समजते. तर, ज्येष्ठ नेते के. सुधाकरन हे सोमवारी रात्री दिल्लीत दाखल होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस नेते के. मुरलीधरन आणि मुल्लापल्ली रामचंद्रन यांच्यासह इतर नेत्यांशीही सोमवारी दिवसभरात संपर्क साधण्यात आला. नेतृत्वाच्या निवडीवरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला, सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन हे तीन नेते राज्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने शनिवारी नवी दिल्ली येथे या तिन्ही नेत्यांची भेट घेतली. या बैठकीला केरळ काँग्रेसचे प्रमुख सनी जोसेफ आणि केरळच्या प्रभारी दीपा दासमुन्शी उपस्थित होत्या. नेतृत्वाच्या मुद्द्यावर पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. पडद्याआड चर्चा सुरू असतानाच, केरळमधील काँग्रेस नेते मात्र अंतिम निर्णयाबाबत अजूनही संभ्रमात व प्रतीक्षेत आहेत. आधीच्या विधानसभेची मुदत २३ मे रोजी संपत आहे. त्यामुळे पक्षाला घाई नाही, असे एका नेत्याने सांगितले.
भाजप नेते हिमंता बिस्व सरमा सलग दुसऱ्यांदा आसामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. आज, मंगळवारी होणाऱ्या सोहळ्याने राज्यात भाजपप्रणित ‘एनडीए’ सरकारचा सलग तिसरा कार्यकाळ सुरू होत आहे. गुवाहाटीच्या खानपारा येथील पशुवैद्यकीय महाविद्यालय मैदानावर होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची उपस्थिती अपेक्षित आहे. त्यांच्यासोबतच ‘एनडीए’चे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहतील.









