क्रूझवरील तिघांना ‘हंटा’ची लागण?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

एमव्ही होंडियस क्रूझ जहाजावरील प्रवाशांना हंटा व्हायरसची लागण झाली आहे. एका फ्रेंच महिलेची चाचणी पॉझिटिव्ह आली असून तिची प्रकृती खालावली आहे. अमेरिकेतील एका प्रवाशाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, तर दुसऱ्याला सौम्य लक्षणे आहेत. बाधित प्रवाशांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

क्रूझवरील तिघांना ‘हंटा’ची लागण?

‘ एमव्ही होंडियस ’ या क्रूझ जहाजावरील हंटा व्हायरसच्या उद्रेकाने बाधित प्रवाशांना परत आणण्यासाठी जगभरातील देशांचे प्रयत्न सुरू आहेत. काही प्रवाशांना रविवारी स्पेनच्या बंदरावर उतरवण्यात आले. त्यांना विलगीकरणात ठेवण्यासाठी धावपळ सुरू असतानाच, एक फ्रेंच महिला आणि दोन अमेरिकी नागरिकांना हंटा व्हायरसची लागण झाल्याचे किंवा त्याची लक्षणे आढळल्याचे सोमवारी निष्पन्न झाले.

‘एका फ्रेंच महिलेची हंटा व्हायरस चाचणी पॉझिटिव्ह आली असून, रात्रभरात रुग्णालयात तिची प्रकृती आणखी खालावली. ही महिला ‘एमव्ही होंडियस’मधून रविवारी पॅरिसला परत आणलेल्या पाच फ्रेंच प्रवाशांपैकी एक होती’, असे फ्रेंच आरोग्यमंत्री स्टेफनी रिस्ट यांनी सांगितले. तर, ‘नेब्रास्काला विमानाने नेण्यात आलेल्या क्रूझमधील १७ अमेरिकी प्रवाशांपैकी एकाची हंटा व्हायरस चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र, त्याला कोणतीही लक्षणे दिसत नाहीत; तर दुसऱ्या एकाला सौम्य लक्षणे आढळली आहेत’, असे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.