‘जगातील कोणतीही शक्ती भारताला झुकवू शकत नाही अथवा दबावाखाली आणू शकत नाही’, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे सोमनाथ अमृत महोत्सवादरम्यान केले. सन १९९८मध्ये याच दिवशी भारताने केलेल्या पोखरण अणुचाचणीच्या संदर्भात त्यांनी हे विधान केले.
सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिराच्या जीर्णोद्धारास ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या मंदिराजवळ सद्भावना मैदानात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. ‘आपल्या देशाला १९४७मध्ये स्वातंत्र्य मिळाले; परंतु १९५१मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा झाल्याचा क्षण म्हणजे भारताच्या मुक्त झालेल्या चेतनेचे द्योतक होते. या प्राणप्रतिष्ठेचा अमृत महोत्सव हा केवळ एक सोहळा नसून पुढील हजारो वर्षे भारताला त्यापासून प्रेरणा मिळणार आहे’, असे ते म्हणाले.
‘एखादा देश हा त्याच्या मुळांशी जोडलेला असेल तरच तो बळकट राहू शकतो, हे सोमनाथ मंदिराने दाखवून दिले आहे. या मंदिरावर आक्रमकांनी वारंवार हल्ले केले, ते उद्ध्वस्त केले. परंतु हे मंदिर पुन्हा पुन्हा उभे राहिले. स्वातंत्र्यानंतरच्या काळात राष्ट्रीय मानबिंदूंच्या स्थानांच्या बाबतीतही राजकारण केले गेले. सोमनाथ मंदिर हे त्याचे मोठे उदाहरण आहे. या मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी व प्राणप्रतिष्ठेसाठी सरदार वल्लभभाई पटेल व तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी अथक परश्रम घेतले; परंतु तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विरोधाला त्यांना तोंड द्यावे लागले. आजही काही शक्ती राष्ट्रीय सन्मानापेक्षा तुष्टीकरणाच्या धोरणास प्राधान्य देतात. अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाच्या वेळीही हीच मानसिकता दिसून आली होती’, अशी टीका त्यांनी केली.
‘आजचा दिवस वेगळ्या अर्थानेही विशेष आहे. सन १९९८मध्ये याच दिवशी (११ मे) तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाने यशस्वी अणुचाचणी केली होती. आपल्या शास्त्रज्ञांनी सर्व जगाला देशाच्या क्षमतेचे दर्शन घडवले. त्या चाचणीमुळे अनेक देशांना धक्का बसला. तसेच, अनेक देशांनी रोषही व्यक्त केला. भारत अणुचाचणी कशी करू शकतो, अशी विचारणा महासत्तांनी केली. भारतावर आर्थिक निर्बंध घालण्यात आले. त्या स्थितीत अन्य कोणताही देश कोसळला असता; परंतु आपला पिंडच वेगळा आहे. आपण दोनच दिवसांनंतर, १३ मे रोजी आणखी दोन अणुचाचण्या केल्या. यातून आपली राजकीय इच्छाशक्ती संपूर्ण जगाने पाहिली. अटलजींचे सरकार कोणत्याही महासत्तेपुढे झुकले नाही’, अशा शब्दांत पंतप्रधानांनी वाजपेयींचा गौरव केला.









