विश्वासार्हतेमुळे महाराष्ट्रात गुंतवणूक

महाराष्ट्र टाइम्स

महाराष्ट्राने उद्योगांमध्ये विश्वासार्हता निर्माण केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, गुंतवणूक सवलतींमुळे नाही तर विश्वासार्हतेमुळे येत आहे. सन २०३० पर्यंत एक लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्णता आणि तंत्रज्ञानावर भर दिला जात आहे. उद्योगांसाठी वीजदर कमी होतील.

विश्वासार्हतेमुळे महाराष्ट्रात गुंतवणूक
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

‘महाराष्ट्राने उद्योगांमध्ये कायमस्वरूपी विश्वास निर्माण केला आहे. राज्यात येणारी गुंतवणूक केवळ सवलतींमुळे नाही; तर विश्वासार्हतेमुळे येत आहे’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथील उद्योग परिषदेत केले.

‘भारतीय उद्योग महासंघा’तर्फे (सीआयआय) आयोजित ‘ॲन्युअल बिझिनेस समिट - २०२६’ या परिषदेत फडणवीस बोलत होते. ‘सीआयआय’चे महासंचालक चंद्रदीप बॅनर्जी आणि अध्यक्ष राजीव मेमाणी यावेळी उपस्थित होते.

‘स्टार्ट अप, थेट विदेशी गुंतवणूक, डेटा सेंटर यात देशात क्रमांक १वर असणाऱ्या महाराष्ट्राच्या भविष्यातील आर्थिक वाटचालीबाबत आमच्या सरकारचा रोड मॅप स्पष्ट आहे. सन २०३०पर्यंत एक लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था आणि २०४७पर्यंत जगातील सर्वांत महत्त्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्था यांचा त्यात समावेश आहे’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

‘आज गुंतवणूकदार सवलतींसोबतच शाश्वत विकास दृष्टिपथात असलेल्या, तसेच दीर्घकालीन विचार, जलद निर्णय आणि विश्वासार्हतेने अंमलबजावणी करणाऱ्या सरकारांच्या शोधात आहेत. सध्याच्या अनिश्चिततेच्या जगात खरी आर्थिक पुंजी असलेला विश्वास निर्माण करण्यासाठी आमच्या सरकारने जाणीवपूर्वक काम केले आहे. पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्णता, प्रतिभा, स्वच्छ ऊर्जा, सुव्यवस्थित शहरीकरण, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास ही सारी क्षमता असणारा महाराष्ट्र त्यादृष्टीने आवश्यक ती इकोसिस्टीम उभारत आहे’, असे फडणवीस यांनी सांगितले.

फडणवीस म्हणाले, ‘महाराष्ट्र हे भारताचे आर्थिक इंजिन राहिले आहे. मात्र, जागतिक अर्थव्यवस्थेच्या पुढील युगासाठी आम्ही महाराष्ट्राला सज्ज करत आहोत. महाराष्ट्र ६६० अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था आहे, जी भारताच्या जीडीपीत सुमारे १५ टक्के योगदान देते.’

‘राज्य सरकारने बहुपदरी वीजबिल योजनाही मंजूर केली आहे. त्यामुळे पुढील काही वर्षांत उद्योगांसाठी दोन ते तीन टक्के आणि घरगुती ग्राहकांसाठीचे वीजदर २६ टक्क्यांनी कमी होतील,’ असाही विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘भविष्यातील महाराष्ट्र कसा असेल याचा रोडमॅप आपण या परिषदेत सादर केला,’ असेही त्यांनी सांगितले.