पिंपरी : दापोडी येथे गुरुवारी (२८ मे) दिवसभरात पाच जणांचा मृत्यू झाला. हे सर्व मृत्यू गावठी दारू प्यायल्याने झाल्याची अफवा पसरल्याने परिसरात खळबळ माजली. सर्व मृत्यू नैसर्गिक असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. दरम्यान, रात्री उशिरा आणखी दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
पांडुरंग सदाशिव फुगे (वय ५७), विजय प्रकाश राठोड (वय ३१), राजेंद्र प्रकाश राठोड (वय ३४), राजेंद्र राजपूत (वय ५१) आणि अकबर पठाण (वय ५२) अशी मृतांची नावे आहेत. फुगे यांना दारूचे व्यसन नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. राठोड बुधवारी विश्रांतवाडीला गेले असता चक्कर आल्याने रुग्णालयात दाखल केले. गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. भावाच्या मृत्यूचा धक्का बसून राजेंद्र यांना फीट आली. उपचारांदरम्यान मृत्यू झाला. राजेंद्र राजपूत यांना बाथरूममध्ये चक्कर आली. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अकबर पठाण यांना १५ वर्षांपासून दारूचे व्यसन होते. गुरुवारी सकाळी त्यांना त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल केले होते.






