नो शो...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

स्वस्त विमान प्रवासाने सामान्य माणूस आकाशात उडू लागला होता. आता इंधन दरवाढीमुळे विमान प्रवास पुन्हा आवाक्याबाहेर गेला आहे. दिल्ली किंवा गोवा येथे जाणेही महाग वाटू लागले आहे. एकेकाळी 'उडान यात्री' म्हणून अभिमानाने प्रवास करणारे आता पुन्हा जमिनीवर आले आहेत. आता रेल्वे आणि लालपरीचे महत्त्व वाढले आहे.

नो शो...

ता आता कुठे आमच्यासारखी जमिनीवर चालणारी माणसं विमानप्रवास करू लागली होती. स्वस्तातल्या एअरलाइन्सनी वीसएक वर्षांपूर्वी भारताच्या आकाशात क्रांतीची भरारी घेतली आणि एरवी फक्त हवाई चपलेपुरताच ‘हवाई’ शब्दाशी संबंध असणारे आम्ही एकदम ‘विमानयात्री’ झालो. तोपर्यंत ‘बुंग’ फक्त ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’पुरतंच ऐकलं होतं. ‘कुर्सी की पेटी’ बांधून जेव्हा आम्ही पहिल्यांदा त्या महाकाय जंबोजेटमधून अवकाशात झेप घेतली, तेव्हा पोटात गोळा आणि डोळ्यांत पाणी एकदम आलं होतं. खेड्यात विनाचप्पल फुफाट्यात चालणारे पाय आज जमिनीपासून काही हजार फूट अंतरावर प्रवास करत होते. हवाईसुंदरी ही खरोखरच सुंदर असते आणि ती आपल्याला जागेवर चहापाणी आणून देते, हे बघून तर आपण निम्म्या जगाचे राजे झालो, असं फीलिंग आलं होतं. पुढं पुढं स्वस्त विमान प्रवासामुळं आमची भीड फारच चेपली. आम्ही देशातल्या देशात का होईना, सारखेच उडू लागलो. पूर्वी गावाकडं भांडणात ‘ऐ, लई उडू नगं’ हे ऐकून घ्यावं लागे. आता आम्ही अभिमानाने ‘उडान यात्री’ झालो होतो. कालांतराने आमच्यासारखेच अनेक मध्यमवर्गीय असंच करू लागले आणि देशातल्या चकाचक विमानतळांना यष्टी स्टँडांची कळा आली. तिथंही बोचकंबाचकं घेऊन मंडळी अस्ताव्यस्त पसरू लागली, शिटांवरून भांडू लागली, लाइनी तोडू लागली, हवाई सुंदऱ्यांचा अपमान करू लागली. त्यामुळंच एका हायफाय नेत्यानं आमचं वर्णन यथार्थपणे ‘कॅटल क्लास’ केलं तेव्हा फार काही शरम वाटलीच नाही. पण देव सगळं बघत असतो. आता इंधनटंचाईमुळं सगळं चक्र उलटं फिरलं आहे. आता विमानप्रवास पुन्हा एकदा आमच्यासारख्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागला आहे. परदेशात तर सोडाच, पण दिल्ली किंवा गोव्यापर्यंत विमानानं जायचंही महाग वाटू लागलंय. आमच्यासारखे अल्पकाळ मौजेत विहरणारे ‘उडानयात्री’ आता शब्दश: जमिनीवर आले आहेत. आता जय इंडियन रेल्वे किंवा लालपरी झिंदाबाद!

- चकोर

नो शो...

नो शो...