युरोपला ‘हीट डोम’ची झळ

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

युरोपमध्ये हवामानबदलामुळे 'हीट डोम'ची स्थिती निर्माण झाली आहे. लंडन आणि फ्रान्समध्ये तापमानाचे नवे विक्रम नोंदवले गेले आहेत. सामान्यपेक्षा १० अंश तापमान वाढले आहे. या तीव्र उन्हाळ्यामुळे आरोग्यव्यवस्थेवर ताण येत आहे. अनेक ठिकाणी वातानुकूलन सुविधा नसल्याने नागरिकांना त्रास होत आहे. समुद्राकिनारी जीवरक्षक वेळेवर उपलब्ध नाहीत. हवामानबदल ही आता वर्तमानातील समस्या बनली आहे.

युरोपला ‘हीट डोम’ची झळ

वामानबदलामुळे टोकाच्या हवामान घटनांची तीव्रता आणि वारंवारता झपाट्याने वाढत आहे. सध्या युरोपमधील अनेक देश उष्णतेच्या लाटेने अक्षरशः होरपळत आहेत. विशेष म्हणजे, यंदा विक्रमी तापमानाच्या नोंदी अपेक्षेपेक्षा खूपच लवकर होऊ लागल्या आहेत. ‘ हीट डोम ’ अर्थात वातावरणातील उच्च दाबामुळे उष्णता एका प्रदेशात अडकून राहण्याची स्थिती यामागे कारणीभूत ठरत आहे.

लंडनमध्ये गेल्या मंगळवारी ३५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याआधी सोमवारीच ३४.८ अंश तापमानाची नोंद होऊन, शंभर वर्षांहून जुना विक्रम मोडीत निघाला. याशिवाय लंडनमध्ये ‘ट्रॉपिकल नाइट’ची, म्हणजे रात्रीचे तापमान २० अंशांच्या पुढे राहिल्याची नोंद झाली. फ्रान्समध्येही कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. युरोपातील या देशांतील या मोसमातील सरासरी तापमानाच्या तुलनेत हे तापमान तब्बल १० अंशांनी अधिक आहे.

हरितगृह वायूंच्या वाढत्या उत्सर्जनामुळे हवामानबदल तीव्र होत असून, उष्णतेच्या लाटा अधिक वारंवार आणि अधिक तीव्र होत असल्याचे शास्त्रज्ञ सतत सांगत आहेत. तरीही, यंदा ब्रिटन आणि फ्रान्समध्ये नोंदवले गेलेले तापमानाचे विक्रम वैज्ञानिकांनाही चक्रावून टाकणारे आहेत. या तीव्र झालेल्या उन्हाळ्यामुळे आरोग्यव्यवस्थेवरील ताण वाढतो आहे. सामान्यतः सौम्य हवामान असलेल्या या प्रदेशांतील अनेक घरे आणि इमारती वातानुकूलन सुविधेविना असल्याने नागरिकांची गैरसोय वाढली आहे. दुसरीकडे, फ्रान्सच्या अटलांटिक किनारपट्टीसारख्या समुद्रातील भोवऱ्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या भागांत उन्हाळ्यात जीवरक्षक तैनात केले जातात; मात्र नियोजनापूर्वीच उष्णतेची लाट आल्याने अनेक किनाऱ्यांवर अद्याप जीवरक्षक उपलब्ध नाहीत. पर्यटकांनी मोठ्या संख्येने समुद्रकिनाऱ्यांकडे धाव घेतल्याने बुडण्याच्या घटनांमध्येही वाढ होत आहे.

हवामानबदल ही भविष्यातील नव्हे, तर वर्तमानातील समस्या बनली आहे. युरोपमध्ये अनुभवास येणाऱ्या या विक्रमी उष्णतेने त्याचीच पुन्हा एकदा जाणीव करून दिली आहे.

- टीम मटा