र्जा समजली जाणारी उष्णता जेव्हा कहर करते, तेव्हा तिचा अतिरेक किती भयंकर असतो हे विदर्भातील उष्माघात ाच्या बळींची संख्या बघून लक्षात यावे. एखाद्या अपघातात, वादविवादात, सामाजिक भांडणात चार-दोन बळी गेले की किती आरडाओरड होते. इकडे वर्षानुवर्षे उष्माघात निमूटपणे बळी टिपतो आणि चर्चाही होत नाही, ही वेदना मोठी आहे. आत्ताही या बळींचे वेगवेगळे आकडे येत आहेत. कर्कवृत्ताच्या लगत हा परिसर असल्याने सूर्याचे किरण थेट जमिनीवर सरळ येतात. त्यामुळे जगातील पहिल्या अत्याधिक उष्ण शहरांच्या यादीत या भागातील एक-दोन शहरे असतातच. येथून समुद्र जवळ नसल्याने थंड हवा येत नाही. उत्तर पश्चिमेकडून येणारे वारे उष्ण आणि कोरडे असतात. त्यामुळे इकडचा उन्हाळा अधिकच कडक असतो. त्यात मोठ्या प्रमाणावर होणारे काँक्रिटीकरण आणि त्यासाठी केली जाणारी वृक्षतोड ही कारणे आहेतच. त्यातच सूर्य जेव्हा रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो, त्या वेळी सूर्यकिरण अधिक तीव्रतेने आणि सरळपणे जमिनीवर येतात. हा काळ विदर्भात ‘नवतपा’ म्हणून ओळखला जातो. भयंकर तापणारे नऊ दिवस. राजस्थानच्या लोककथांमधून ही संकल्पना पुढे आल्याचे सांगितले जाते. तथापि, एप्रिल आणि मे महिन्यात जमीन प्रखर सूर्यप्रकाश शोषून घेते. ती तापलेली असते. त्यामुळे वाहणारी हवादेखील गरमच असते. अशा वेळी शारीरिक श्रम करणारे शेतकरी, श्रमिक, वृद्ध यांच्या शरीराचे तापमान वाढते. ते अनियंत्रित होते आणि जीव गमवावा लागतो. त्यावर उपाय म्हणून दर उन्हाळ्यात प्रशासन आदेश काढते की, कामगारांना दुपारी बारा ते चार विश्रांती द्या. कुणीही ते ऐकत नाही. कंपनीला कामे काढून घ्यायची असतात आणि मजुराला त्याचे हातावर असणारे पोट भरायचे असते. त्यामुळे भर उन्हात कामे होतात. सरकारचे आदेश न ऐकणाऱ्यांवर कुठलीही कारवाई होत नाही, कारण कायद्याने प्रशासनाला तसे अधिकारच दिलेले नाहीत. उष्माघातांच्या बळींची संख्या ‘अज्ञात कारणाने मृत्यू’ या रकान्यात भरून मोकळे होतात. या सगळ्या उष्म्यामागे हवामान बदलाचाही हात आहेच. उष्माघात वेळीच उपाय करून थांबवता येतील, पण उष्णतेने या भागाचे वाळवंट होईल अशी भीती ‘टेरी’ आणि जागतिक बँकेच्या अहवालातून डोकावत असते. ती अधिक धोकादायक आहे. यामुळे एखादा भागच उष्माघाताचा बळी ठरू नये, या दृष्टीने उपाय करायला हवेत. हवामान बदलाच्या हाका वेळीच ऐकायला हव्यात.






