खतांची नोंदणीआता ॲपद्वारे

महाराष्ट्र टाइम्स

केंद्र सरकारने खतांच्या वितरणासाठी नवीन ॲप आणले आहे. या 'फर्टिलायझर सेल ॲप्लिकेशन सिस्टीम' ॲपमुळे शेतकरी आता घरबसल्या खतांची ऑनलाइन नोंदणी करू शकतील. यामुळे खत खरेदीसाठी रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये हा प्रयोग सुरू होणार आहे. या नवीन प्रणालीमुळे खत विक्रीत अधिक पारदर्शकता येईल.

launch of online registration app for subsidized fertilizers convenience for farmers

केंद्र सरकारने अनुदानित खतांच्या वितरणासाठी राष्ट्रीय खत विक्री आराखड्यांतर्गत ‘फर्टिलायझर सेल ॲप्लिकेशन सिस्टीम’ (एफएसएएस) हे ॲप विकसित केले आहे. शेतकऱ्यांना या ॲपद्वारे खतांची ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. शेतकरी त्यांच्या सोयीनुसार आणि निवडलेल्या विक्रेत्याकडे खतांची खरेदी करू शकणार आहेत. ऑनलाइन नोंदणीमुळे शेतकऱ्यांना रांगेत तिष्ठावे लागणार नाही.

‘राष्ट्रीय खत विक्री आराखडा प्रकल्पांतर्गत एफएसएएस हे मोबाइल ॲप तयार करण्यात आले आहे. ॲपमधून क्यूआर कोडद्वारे शेतकऱ्यांना खतांची नोंदणी करता येणार आहे. राज्यात कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबविला जाणार आहे. शेतकरी व खत विक्रेत्यांची जनजागृती करण्यात येणार आहे,’ अशी माहिती कृषी आयुक्तालयातील संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) सुनील बोरकर यांनी दिली.

शेतकऱ्यांनी खतांची नोंदणी केल्यानंतर क्यूआर कोड तीन दिवस वैध राहणार आहे. शेतकऱ्यांच्या सोयीनुसार त्यांनी निवडलेल्या खत विक्रेत्याकडे जाऊन खत खरेदी करता येणार आहे. आवश्यक खताची नोंदणी केल्यामुळे इतर अनावश्यक खते घेण्याची सक्ती विक्रेत्यांना करता येणार नाही. त्यामुळे खत विक्रीमध्ये पारदर्शकता येणार आहे. या वितरण प्रणालीची केंद्र सरकारच्या चमूने अष्टापूर (ता. हवेली) येथे चाचणी घेतली. दुसऱ्या टप्प्यात यंदा खरीप हंगामात कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत पथदर्शी प्रयोग राबवला जाईल.